महाविकास आघाडीची पंचसुत्री नव्हे, थापासुत्री! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका
14-Nov-2024
Total Views | 46
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीने पंचसुत्री आणली. पण ही तर थापासुत्री आहे. थापा मारणाऱ्या थापाड्यांनी आमचा वचननामा कॉपी पेस्ट केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीगरमध्ये महायूतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला भरभरून दिले. आम्ही मागितले आणि त्यांनी दिले नाही, असे कधीच झाले नाही. मात्र, आधीचे सरकार मी कशाला मागू, या अहंकारात होते. परंतू, राज्यकर्त्याने महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणे म्हणजे कमीपणा नाही. आम्ही राज्याला विकासाकडे नेण्यासाठी दिल्लीत जातो, पण ते मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी करण्यासाठी दिल्लीला जातात. बाळासाहेब असताना सगळे मातोश्रीमध्ये येत होते. आता उलट झालं असून त्यांना दिल्लीच्या गल्लीगल्लीत फिरावे लागत आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्याने ही परिस्थिती आली आहे," अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात काय केले आपल्याला माहिती आहे. घरात बसून कोमट पाणी प्यायचे आणि इतरांनाही प्यायला सांगायचे. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही. गृहमंत्री खंडणीच्या आरोपाखाली तुरुंगात जात होते आणि हे इकडे सगळे प्रकल्प बंद पाडत होते. भ्रष्टाचाराची दुकाने राजरोसपणे सुरु होती. पण आम्ही ती सत्ता उलथवून टाकली. टांगा पलटी करून महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महायूतीचे सरकार आणले. गेल्या दोन वर्षात महायूतीने कामाचा डोंगर उभा केला. महाबिघाडीच्या काळात फक्त भ्रष्टाचाराचे अड्डे होते. पण आम्ही ते बंद केले आणि विकास केला. आम्ही महाराष्ट्राची गेलेली पत पुन्हा मिळवली. आम्ही केलेली कामे बघून महाविकास आघाडीच्या तोंडाला फेस आला आहे. ज्या योजनांच्या नावाने त्यांनी बोटे मोडली त्याच योजनांची हातोहात चोरी केली. त्यांनी आमचा विकासनामा चोरला. पंचसुत्री आणली. पण ही तर थापासुत्री आहे. थापा मारणाऱ्या थापाड्यांनी आमचा वचननामा कॉपी पेस्ट केला. पण जनता सगळे ओळखून आहे."
"काँग्रेस आघाडी ही मोहब्बतचे नाही तर खोटारडेपणाचे दुकान आहे आणि उद्धव ठाकरे त्या दुकानाच्या गल्ल्यावर बसलेत. महाराष्ट्राच्या जनतेला ग्राहक बनवण्याचा त्यांचा डाव आहे. पण जनता सुज्ञ असून त्यांना भीक घालणार नाही. त्यामुळे येत्या २० तारखेला महाविकास आघाडीच्या दुकानाचे शटर कायमचे बंद झाल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.