भरतनाट्यम् जगणार्‍या सोनाली करंदीकर

    09-Jan-2024   
Total Views |
Sonali Karandikar

अवघ्या पाचव्या वर्षांपासून सुरू झालेला, त्यांचा भरतनाट्यम्चा नृत्यमय प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. जाणून घेऊया, नाशकात भरतनाट्यमची मुहूर्तमेढ रोवणार्‍या सोनाली करंदीकर यांच्याविषयी...

पुण्यात जन्मलेल्या सोनाली करंदीकर यांना अगदी बालपणापासूनच नृत्याची आवड होती. आईलाही शास्त्रीय नृत्याची आवड होती; मात्र ती जोपासणे त्यांना शक्य न झाल्याने, त्यांनी मुलगी सोनालीला अवघ्या पाचव्या वर्षीच भरतनाट्यम्च्या क्लासमध्ये घातले. सोनाली शाळेत जाऊन, क्लासला भरतनाट्यम् शिकत होत्या. शाळेतही विविध नृत्य स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्राथमिक शिक्षण त्यांनी नवीन मराठी शाळेतून, तर माध्यमिक शिक्षण अहिल्यादेवी हायस्कूलमधून पूर्ण केले. माणिक अंबिके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एसएमबीटी कॉलेजमध्ये भरतनाट्यम्चे सात वर्षं प्राथमिक शिक्षण घेतले. नृत्यासाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी त्यांनी पुढे एस. पी कॉलेजमध्ये कला शाखेला प्रवेश घेतला. समाजशास्त्र विषयात त्यांनी पदवी घेतली. सुरुवातीची चार वर्षे तर सोनाली या नृत्याच्या क्लासला जात असल्याचे, आईवडील वगळता कुणालाही माहीतदेखील नव्हते. इयत्ता बारावीनंतरच सोनाली यांचे अरंगेत्रम झाले.

भरतनाट्यम् हा पारंपरिक, शास्त्रशुद्ध शास्त्रीय नृत्यप्रकार असल्याचे समजू लागल्यानंतर, सोनाली यांना नृत्यासाठी होणारा विरोध हळूहळू मावळत गेला. १९९८ साली त्यांनी सुचेता चापेकर यांच्याकडून भरतनाट्यम्चे धडे घेण्यास सुरुवात केली. गांधर्व महाविद्यालयातून त्या विशारद झाल्या. लग्नानंतर नाशिकला स्थायिक झाल्याने, त्यांना ’एमए’ काही करता आले नाही.नाशिकमध्येही कित्येकांना भरतनाट्यम् असा काही नृत्यप्रकार असतो, हेच माहीत नव्हते. अशा परिस्थितीतही २००१ साली सोनाली यांनी घराजवळच एका भाड्याच्या हॉलमध्ये नृत्याली भरतनाट्यम् अकादमी स्थापन केली. सुरुवातीला भरतनाट्यम् हा नृत्य प्रकार समजून सांगण्यातच त्यांचा वेळ गेला. प्रारंभी फक्त तीन मुलींनी प्रवेश घेतला. या दरम्यान महिन्यातून एकदा सोनाली सुचेता चापेकरांकडे जाऊन भरतनाट्यम्चे धडे घेत होत्याच. अनेक महिने फी जमा होत नसल्याने, एक वेळ त्यांनी क्लासेस न घेण्याचा विचारही केला. परंतु, त्यांनी हार मानली नाही. कालांतराने अकादमीमध्ये गर्दी वाढू लागली. हॉल अपुरा पडत असल्याने, २००३ साली त्यांनी ’इगल स्पोर्ट्स क्लब’ला क्लास घेण्यास सुरुवात केली.

पंडित जसराजजी, पंडित भीमसेन जोशी यांच्या मराठी अभंगांवर नृत्य बसविण्यास सुरुवात केली. गाणं कळलं की, नृत्य कळतं म्हणूनच त्यांनी मराठी गाण्यांवर भरतनाट्यम् करण्यास सुरुवात केली. कानडी, तमिऴ भाषेतील गाणी असल्याने, अनेकांना भरतनाट्यम् समजत नव्हते, त्यामुळे सुरुवातीला भरतनाट्यम्चा प्रचारप्रसार करण्यास त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. श्रीराम नवमी, जन्माष्टमी अशा विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विविध मंदिरांमध्ये ’नृत्याली भरतनाट्यम् अकादमी’ने नृत्यसेवा देण्यास सुरुवात केली.सध्या ’नृत्याली अकादमी’च्या माध्यमातून सोनाली जवळपास १०० जणांना भरतनाट्यम्चे धडे देत असून, आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७० ते ८० जण विशारद झाले. प्राथमिक शिक्षण घेतलेल्यांची संख्याही हजारांहून अधिक असून, अरंगेत्रमची संख्या तीन आहे. सोनाली यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती, सुचेता चापेकर यांच्यासह वडील नारायण भिडे, आई गायत्री भिडे, पती समीर करंदीकर, मुलगी प्रिया करंदीकर यांचे मार्गदर्शन तथा सहकार्य लाभते.

२०१९ साली इटलीत ’वर्ल्डकप ऑफ फोकलोर’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २२ देशांमधून त्यांनी भारताला पहिला क्रमांक मिळवून दिला. २०२३ मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेतही ’नृत्याली भरतनाट्यम् अकादमी’ने भारताचे प्रतिनिधित्व करत, विजय प्राप्त केला होता. २०१५ साली अलका लाजमी आणि सुचेता चापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भरतनाट्यम्मधून पदव्युत्तर पदवी घेतली. नृत्य सादर करत असताना, सोनाली यांचे शिष्य त्यामागील इतिहास, मूळ आणि माहितीदेखील सांगतात. गीता रहस्यदेखील सोनाली शिष्यांना समजावून सांगतात. जितका इतिहास कळतो, तितके नृत्य अधिक खुलते. त्यामुळेच त्या नृत्य शिकविण्याबरोबरच त्यामागील मूळदेखील उलगडून सांगतात.”भार, राग आणि ताल यांचे एकत्रित नाट्य म्हणजे भरतनाट्यम् होय. शास्त्रीय नृत्य बर्‍यापैकी अध्यात्मावर आधारित असते.


मागील पाच ते सहा वर्षांमध्ये बराच बदल पाहायला मिळत आहे. अनेक जणांचा भरतनाट्यम्मधून पदवी, पदव्युत्तर पदवी घेण्याकडे कल दिसून येत आहे. श्रद्धा असेल तर वेळ नक्की काढता येतो. शास्त्रीय नृत्य बघितले पाहिजे. पालकांनीही आपल्या मुलांना शास्त्रीय नृत्याविषयी सांगितले पाहिजे,” असे सोनाली सांगतात.भजगोविंदम स्तोत्रही त्या नृत्यातून मांडतात. ’संभवामी युगे युगे’ या प्रयोगाद्वारे त्यांनी गीतेचे संपूर्ण १८ अध्याय नृत्याच्या माध्यमातून दाखविले. या प्रयोगाला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद लाभला होता. अवघ्या पाचव्या वर्षांपासून सुरू झालेला, सोनाली यांचा भरतनाट्यम्चा नृत्यमय प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. त्यांना व त्यांच्या ’नृत्याली भरतनाट्यम् अकादमी’ला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
अधिक माहितीसाठी संपर्क ः ७०५८५८९७६७

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.