साहित्य, नाटक, कौटिलीय अर्थशास्त्र, वेदान्त अशा संस्कृतमधील सर्व शाखांवर प्रभुत्वप्राप्त ज्येष्ठ लेखिका, व्याख्यात्या, शिक्षिका, अभ्यासिका डॉ. मंगला मिरासदार यांच्याविषयी...
1962च्या भारत-चीन युद्धकाळातील प्रसंग. नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयात संस्कृतचा तास चालू होता. गुरुजी ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’तील ‘मंडलयोनि’ अर्थात ‘राजमंडल’ संकल्पना शिकवत होते. तत्कालीन परिस्थितीतील ताज्या उदाहरणांसह ‘शेजारी राष्ट्र हे आपले नैसर्गिक शत्रू असते’ इत्यादी कौटिलीय संकल्पनांवर चर्चा चालू होती. वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांप्रमाणे मंगलादेखील तल्लीन झाल्या होत्या. गुरुजींनी त्यांना विचार करायला जणू भागच पाडले होते. ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’तील प्रत्येक संकल्पनेचा त्या बारकाईने विचार करू लागल्या. ते पुन्हा पुन्हा अभ्यासू लागल्या. पुढे केवळ स्वयंअध्ययनातून शिकलेल्या डॉ. मंगला मिरासदार आज एक विख्यात ‘कौटिल्य अभ्यासक’ म्हणून ओळखल्या जातात.
मंगला पानसे यांचा जन्म 1946 सालचा. आईवडील, सहा बहिणी आणि दोन भाऊ असे मोठे कुटुंब. पैकी मंगला सर्वांत धाकट्या. त्यांच्या लहानपणीच वडील निवृत्त झाल्यामुळे आर्थिक परिस्थितीही तशी बेताचीच. परंतु, मोठ्या भावांचा स्नेह आणि भक्कम पाठिंब्यामुळेच त्या शिक्षण घेऊ शकल्या. मंगला यांना शालेय वयापासून संस्कृतची आवड होती. त्या स्नेहसंमेलनांत आवर्जून संस्कृत नाटिका सादर करत असत. तसेच त्यांनी ‘टिळक महाराष्ट्र विद्यालय’ आणि संस्कृतच्या अन्य परीक्षाही दिल्या. सुरुवातीला प्रवेशशुल्क भरण्याचीही वानवाच होती. पण, पुढे बक्षिसे आणि शिष्यवृत्ती मिळवत त्यांनी स्वबळावर शिक्षण सुरुच ठेवले.
नाशिकमध्येच एचपीटी महाविद्यालयात त्यांनी ‘एमए’पर्यंत शिक्षण पूर्ण केले. ‘बीए’संस्कृत शिकत असताना त्यांना ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’ची गोडी लागली होती; पण त्या काळी तेथे अधिक विषय उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी ‘वेदान्त’ विषय घेऊन ‘एमए’ पूर्ण केले. कौतुकाची बाब म्हणजे, पदवी मिळताच त्यांना त्याच महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही पाचारण केले गेले. चार वर्षे नाशिकमध्ये अध्यापनानंतर त्या लग्न होऊन पुणेकर झाल्या. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मंगला मिरासदार यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन सुरू ठेवले. नवख्या व्यक्तीसमोर व्याकरणाचा राक्षस सर्वप्रथम उभा करण्यापेक्षा जसे एखादे बाळ मातृभाषा शिकते, तितक्या सहजी संस्कृत शिकले गेले पाहिजे, असे त्या सांगतात. नवीन पिढीमध्ये संस्कृतची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या संस्कृत एकांकिका स्पर्धांनादेखील राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला.
परंतु, त्यांची शिकण्याची ऊम त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांनी ‘पीएचडी’ करण्याचा निर्णय घेतला. ‘पंचमहाकाव्यातील राजकीय संकल्पना’ हा विषय घेत साहित्यिक रचनांमध्येही राजकीय संकल्पना कशा दिसून येतात, हे त्यांनी मांडले. संस्कृत साहित्य आणि राजकीय संकल्पनांसाठी आधार घेतलेले ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ यांचा एकत्रित अभ्यास करण्याची प्रक्रिया त्यांना खूप आनंद देऊन गेली. त्यानंतर लगेचच त्यांनी अर्थशास्त्राचाच आधार घेत ‘आसाममधील ग्रामीण अर्थव्यवस्था’ या विषयावर प्रबंधलेखन केले. यातूनच त्यांना आपण लिहू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला. तसेच, मार्गदर्शकांनी दिलेल्या कालिदासाविषयीही ललितलेखन करण्याच्या प्रेरणेमुळे डॉ. मंगला यांची ‘मी कालिदास’ ही कलाकृती जन्माला आली. कालिदासाच्या रचना जरी आवडत असल्या, तरी त्यांना त्याच्याबद्दल असलेल्या काही दंतकथा मात्र पटलेल्या नव्हत्या. त्यामुळे सातही रचनांचा पुन्हा एकदा सांगोपांग अभ्यास करून त्यांनी कालिदासाची प्रत्येक रचनेमागील प्रेरणा इतिहासातील दाखले, ताम्रपट अभ्यासत, काळाचे संदर्भ देत मांडली. त्यांनी खर्या अर्थाने कालिदासाच्या रचनांमागील एक व्यक्ती म्हणून कालिदास अभ्यासत, त्याचा संपूर्ण जीवनपट वाचकांसमोर आणला आणि त्यासाठी त्यांना ‘कमल तांबे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’देखील मिळाला.
‘प्रतिज्ञायौगंधरायण’ आणि ‘स्वप्नवासवदत्ता’ यांच्या जोडकथेतून त्यांनी ‘घोषवती’ लिहिले, ‘प्रतिमा’ नाटक संपादित केले, ‘मुद्राराक्षसम्’ नाटकाच्या आधारे ‘राजमुद्रानामक’ कादंबरी लिहिली. याज्ञवल्क्य यांचा जीवनपट मांडणारी ‘त्रिदल’ कादंबरी लिहिली. अशा प्रकारे साहित्य, नाटके, अर्थशास्त्र, वेदान्त अशा संस्कृतमधील सर्व शाखांवर प्रभुत्व असणाऱ्या डॉ. मंगला मिरासदार या निरंतर लिखाण करत होत्या. त्यांना त्यांच्या कार्यासाठी ‘टिमवि’कडून लोकमान्य टिळक पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. अशातच लिखाणासाठी पूर्वाभ्यास करताना त्यांच्या असे लक्षात आले की, मराठी भाषेमध्ये ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’वर केवळ एकच पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करत त्यांनी ‘कौटिलीय अर्थशास्त्र : एक अध्ययन’ या विवेचनात्मक पुस्तकाची रचना केली. त्याचबरोबर ‘कथा सुभाषितांच्या’सारखी अन्य काही पुस्तके त्यांनी लोकाग्रहास्तवदेखील लिहिली.
“आजच्या काळात मुलांनी केवळ गुण मिळवण्यासाठी संस्कृतचा अभ्यास न करता, आपली पुरातन भारतीय शास्त्रे समजून घेण्यासाठी ग्रंथांचा अभ्यास करावा. सोयीनुसार भाषांतरित ग्रंथ वाचावे, परंतु आपले बीज ज्यात आहे, ते शाश्वत साहित्य प्रत्येकाने समजून घ्यावे,” असे त्या आवर्जून सांगतात. डॉ. मंगला यांची अलीकडच्या काळात ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ या विषयावर दहा पुष्पांची संपूर्ण संस्कृत व्याख्यानमाला झाली. तसेच त्यांनी ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’तील सर्व संकल्पना मांडणाऱ्या एका चित्रमालिकेसाठीही काम केले आहे.
डॉ. मंगला मिरासदार यांचे साहित्य आज देशभरातील विद्यापीठांमध्ये संदर्भासाठी अभ्यासले जाते. त्यांच्या पुस्तकांमार्फत आणखी असंख्य संस्कृतअभ्यासक घडो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
- ओवी लेले