लालमातीतील हरितमनाचा संशोधक

    30-Oct-2025   
Total Views |

Prof. Dr. Pratap Vyakantrao Naikwade
 
कोकणातील लालमातीत वनस्पती संशोधनाचे काम करणारे देवरुखच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रताप व्यकंटराव नाईकवाडे यांच्याविषयी...
 
वनस्पतीवर संशोधन करण्याच्या दृष्टीने या माणसाने आपल्या करिअरला कलाटणी दिली. विदर्भातील प्राध्यापकीच्या सरकारी नोकरीवर पाणी सोडून या माणसाने कोकण गाठले. इथली जैवविविधता ओळखून विद्यार्थ्यांना संशोधनाची दृष्टी देत सह्याद्रीच्या मातीत वनस्पतीच्या संशोधनाचे काम सुरू केले. कोकणातील भूमीशी इमान राखून वनस्पती संशोधनाचा विडा उचललेला हा माणूस म्हणजे, प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे.
 
नाईकवाडे यांचा जन्म २८ ऑटोबर, १९८१ रोजी बीड जिल्ह्यातील चौसाळा गावात झाला. त्यांचे वडील व्यकंटराव यांचा कापडाचा व्यवसाय होता. शिवाय ते शेती देखील करत. नाईकवाडे यांचे शालेय शिक्षण बीडमध्येच पार पडले. त्यांना निसर्ग आणि शेतीची देखील ओढ होती. मात्र, विज्ञान शाखेतून शिक्षण घेऊन पुढे ‘एमबीबीएस’ करून डॉक्टर होण्याचा निर्धार त्यांनी शालेय जीवनातच केला होता. त्यानुसारच त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू होता. दरम्यान डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी त्यांनी ‘सीएटी’ची परीक्षा दिली. मात्र, त्यात थोडे कमी गुण मिळाले आणि ‘एमबीबीएस’ची संधी हुकली. मात्र, नाईकवाडे निराश झाले नाही.
 
‘पीएचडी’च्या माध्यमातून डॉक्टर होण्याचा निर्धार त्यांनी केला. पुढे पदवीचे शिक्षण बीडच्या बलभीम महाविद्यालयामधून वनस्पतीशास्त्राच्या शाखेतून सुरू केले. पदवीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत ते वनस्पतीशास्त्र विभागात प्रथम आले. पुढे वनस्पतीशास्त्रामधूनच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याचे निश्चित झाले आणि त्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून नाईकवाडे यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांचा विशेष विषय होता, ‘प्लान्ट फिजियोलॉजी.’ याच अभ्यासादरम्यान त्यांचा कल संशोधनाकडे वाढत गेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील कॅप्टन डॉ. भारती जाधव यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांनी ‘पीएचडी’च्या संशोधनाला सुरुवात केली. पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणानंतर त्यांनी लागलीच ‘मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन’मध्ये प्रवेश मिळवून ‘बीएड’चे शिक्षण २००५ साली पूर्ण केले. त्यादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात वयाच्या २४व्या वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली.
 
नाईकवाडे यवतमाळला स्थायिक झाले. नोकरीला सुरुवात झाली. मात्र, त्यांचे मन काही नोकरीत रमेना. नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवसात छत्रपती संभाजीनगरला त्यांचे येणे-जाणे सुरू झाले. मात्र, लहानपणी डॉटर होण्याचे मनी बाळगलेले स्वप्न त्यांना पूर्ण करायचे होते. अखेरीस २०१० साली ‘अन्नसंवर्धन आणि पिकांच्या पोषक स्रोतांचे जैवतंत्रज्ञान पैलू’ या विषयातून त्यांनी ‘पीएचड’चे संशोधन पूर्ण केले.
 
यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयाच्या नोकरीवर पाणी सोडून देवरुखच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयातील (एएसपी) वनस्पतीशास्त्र विभागात नोकरी पत्करली. सध्या सहयोगी प्राध्यापक आणि वनस्पती शास्त्र विभाग म्हणून ते कार्यरत आहेत. २०१४ साली हवामान बदलाचा वनस्पतींवर होणारा परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ‘यूजीसी’ने आपल्या फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत अमेरिकेला जाण्यासाठी नाईकवाडे यांची निवड केली होती. त्याठिकाणी सहा महिने राहून त्यांनी संशोधन केले. अ‍ॅरिझोना विद्यापीठातून त्यांनी ‘हवामान बदलाचा पशुधन उत्पादनावर, माती आणि वनस्पतींमध्ये कार्बन संचयनाचा होणारा परिणाम’ या विषयासंदर्भात ‘पोस्ट डॉटरेट’चा अभ्यास केला आणि २०१६ साली ते पुन्हा भारतात परतले.
 
मुलांमध्ये संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्याकडे नाईकवाडे यांचा कल असून, स्थानिक जैवविविधता प्रकाशझोतात आणण्यासाठीही ते कायम प्रयत्नशील असतात. तणांपासून सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय खतांचा पिकांवरील परिणाम, प्रगत पद्धतींनी कमी कालावधीत विविध सेंद्रिय खते तयार करणे, या विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे. देवरुखच्या सड्यावरुन त्यांनी ‘इपिजिनीया देवरुखेन्सीस’ या नव्या वनस्पतीच्या प्रजातीचा शोधदेखील लावला. अनेक शोधनिबंधदेखील सादर केले. स्थानिक बांधलकी म्हणून त्यांनी तीन वर्षांपूर्वी देवरुखचे प्रतीक मोरे, डॉ. शार्दुल केळकर, प्रशांत शिंदे, कुणाल अनेराव यांच्या सहकार्याने ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.
 
पर्यावरण क्षेत्रात कोकणासाठी चांगले काम करण्यासाठी गरज ओळखून ‘देवरुख शिक्षण प्रसारक मंडळा’चे अध्यक्ष सदानंद भागवत तसेच प्राचार्य तेंडोलकर यांनी नाईकवाडे यांना संस्थेत काम करण्याची परवानगी दिली. सध्या ते महाविद्यालयाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र जनुकीय कोषा’च्या आर्थिक साहाय्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रानभाज्यांच्या प्रजातींची नोंद आणि त्यांच्या पौष्टिक व औषधी मूल्यांवर संशोधनाचे काम करत आहेत. त्यांना चार पेटंटदेखील मिळाले आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.