स्वच्छतेचा एखादा पॅटर्न यशस्वीपणे राबवून कचरा संकलन करण्याचा आदर्शवत धडा इतरांना देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रामदास कोकरे यांच्याविषयी...
रामदास कोकरे हे मूळचे करमाळा तालुक्यातील उंदरगावअंतर्गत रिटेवाडी गावचे. उजनी धरणात १९८०च्या आसपास पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यास सुरुवात झाल्याने, या धरणाच्या पट्ट्यात असलेल्या रिटेवाडी गावाचे पुनर्वसन झाले. गावातील लोक आपआपल्या सोयीने पर्यायी जागेत स्थायिक होऊ लागले. कोकरे यांच्या कुटुंबाची सुपीक जमीन प्रकल्पात गेली. परंतु, शिल्लक माळरानावरही त्यांची जमीन असल्याने, कोकरे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. पिढ्यानपिढ्या सुरु असलेला मेंढरं राखण्याचा व्यवसायच उदरनिर्वाहासाठी कोकरे कुटुंबीय करत होते. पुनर्वसनामुळे गावातील शाळाही बंद झाली होती.
गावकर्यांच्या परिश्रमाने शाळा पुन्हा सुरू करण्यात आली. कोकरे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेत असताना, दुसरी इयत्तेत विद्यार्थीच नसल्याने, शिक्षकांनी कोकरे यांना दुसरीच्या वर्गात प्रवेश घेण्याविषयी त्यांच्या वडिलांना सुचवले. त्यामुळे दुसर्या इयत्तेतूनच शिक्षणास कोकरे यांनी श्रीगणेशा केला. कोकरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यामिक शिक्षण गावात उपलब्ध नसल्याने, राजुरी येथे ते अनवाणी पायी जात. दहावीचे शिक्षण करमाळा येथून, तर बारावीचे शिक्षण बार्शीतून पूर्ण केले. पुढे ‘बीएससी अॅग्री’साठी पुणे येथे प्रवेश घेतला.
घरची परिस्थिती अत्यंत बिकट, मेंढपाळ यांच्या हालअपेष्टा, कष्टप्रद जीवन, पुनर्वसनानंतर पदोपदी सोयी-सुविधांसाठी करावा लागणारा संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला होता. त्यामुळे कोकरे यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही, कधी आपल्या गावाकडे दुर्लक्ष केले नाही. गावातील समस्या सोडवण्यासाठी आपण काहीतरी चांगले केले, पाहिजे, असेच त्यांना वाटे. त्यामुळे गावात काही नावीन्यपूर्ण योजना राबवता येतात का? यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. गावात रस्ता नसल्याची खंत त्यांना कायमस्वरूपी होती. त्यामुळे रस्त्यासाठी ते अथक परिश्रम घेत होते.
कोकरे यांची गावाप्रतीची धडपड पाहून गावकरी कोकरे यांच्यात भावी सरपंच पाहू लागले होते. पण कोकरे यांच्या वडिलांनी त्यांना "गावात राहून एक गाव सुधारशील. पण अधिकारी झालास, तर अनेक गावे सुधारशील,” असा सल्ला दिला. वडिलांनी दिलेला मूलमंत्र उराशी बाळगतच कोकरे यांनी, वडीलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर स्वतःचा एक वेगळाच पॅटर्नही निर्माण करत, अनेक शहरे कचरामुक्त केली. त्यांचा ‘स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न’चा इयत्ता सहावी विज्ञान, इयत्ता बारावी पर्यावरण अभ्यास व जलसुरक्षा आणि पर्यावरणशास्त्र पदवीपूर्व अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
त्यांची २००५ साली पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रशासनात राहून गावांसाठी जे करता येईल ते करायचं, हेच ध्येय त्यांच्या डोळ्यांसमोर होते. पोलीस उपनिरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी गावोगावी बैठका घेऊन गावातील भांडणे, अनेक वाद सामंजस्य निर्माण करून मिटवले. २००८ साली त्यांनी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील गावांमध्ये, ‘तंटामुक्त गाव’ मोहीम यशस्वीपणे राबवली. पोलीस सेवेत असतानादेखील ते, पर्यावरण संरक्षणाविषयी अत्यंत संवेदनशील होते.
पुढे त्यांनी २०१० साली मुख्याधिकारी पदी निवड झाल्याने, पोलीस उपनिरीक्षक पदाचा राजीनामा दिला. पर्यावरणप्रेमी कोकरे यांनी दापोली येथील मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठीही पुढाकार घेतला. पहिल्या दिवशी त्यांनी प्लास्टिकबंदी केली. ही बंदी यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या मदतीने, नवनवे प्रयोगही राबवले. त्यांच्या कामांची दखल तत्कालीन पर्यावरण सचिवांनी घेत, हा उपक्रम सर्व नगरपालिका व महानगरपालिकांना राबवण्याचा आदेशही काढला. त्यामुळे दापोली नगर परिषदेच्या माध्यमातून कोकरे यांच्या उल्लेखनीय कार्याचा, एक वेगळाच पॅटर्न तयार झाला. पुढे कोकरे यांनी असेच वेगवेगळे उपक्रम, मराठवाड्यातील विविध नगरपालिकांमध्ये राबिवले.
लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व संगमनेर नगर परिषदेमध्येही ही वेंगुर्ला पॅटर्न यशस्वी ठरला. वेंगुर्ला नगर परिषदेमधील त्यांच्या कार्याची दखल, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. ज्या ठिकाणी नियुक्ती होईल त्याठिकाणी त्यांनी प्लास्टिक व कचरामुक्त परिसर, डम्पिंग ग्राऊंडविरहित नगर परिषद अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट मुख्याधिकारी, ’वसुंधरा मित्र’, ’वसुंधरा सन्मान’, ’सिंधुदुर्ग भूषण’, ’समाजभूषण’, ’सर्वोत्कृष्ट नगर परिषद वसुंधरा पुरस्कार’ स्वच्छ सर्वेक्षणमध्ये, पश्चिम भारतात पहिल्या दहामध्ये अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. स्वच्छता अभियानात राज्य व देशपातळीवर वेंगुर्ला अव्वल ठरले. याशिवाय, कर्जत, माथेरान, कल्याण-डोंबिवली व सध्या लातूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, नगरपंचायती डम्पिंग ग्राऊंडमुक्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
कोकरे यांनी विविध शहरांत नवीन उपक्रम राबवले, हेच त्यांचे वैशिष्ट्य. हे सर्व करतानादेखील त्यांचे गावाकडे लक्ष असून, गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. सध्या कोकरे हे ‘केडीएमसी’मध्ये कचरा व्यवस्थापन विभागात उपायुक्तपदावर कार्यरत आहेत. माथेरान नगर परिषदेने एका रस्त्याला ‘मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे मार्ग’ असे नाव देऊन, त्यांच्या कार्याचा गौरव केला ही बाब कौतुकास्पद आहे. रामदास कोकरे यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.