न्यायपथावरील हणमंत

    28-Oct-2025
Total Views |

Adv. Hanmant Kondiba Jimal
 
सातारा जिल्ह्यातील माण तालुयातील गंगोती या छोट्या खेड्यातून आपले शिक्षण, जिद्द आणि स्वप्न यांच्या बळावर पुढे आलेले अ‍ॅड. हणमंत कोंडीबा झिमल या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाविषयी...
 
अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले हणमंत झिमल यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गंगोती येथे, तर माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पुळकोटी येथे पूर्ण केले. पुढे सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पदवीचे शिक्षण भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, वडाळा येथून ‘एल.एल.बी.’ आणि मुंबई विद्यापीठातून ‘एल.एल.एम.’ पूर्ण केले.
 
ग्रामीण भागातून येणार्‍या तरुणासाठी हे साधं काम नव्हतं. कारण, शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर संघर्ष होता, पण तोच संघर्ष त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनला. हणमंत झिमल यांचे आदर्श आहेत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विठ्ठल लहाने ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचं जग उभं केलं आणि समाजासाठी काम केले. त्याच प्रेरणेने झिमल यांनी आपल्या आयुष्याची वाट ठरवली. यासोबत हणमंत यांना त्यांच्या आई-वडिलांच्या त्यागातून कर्तृत्वाचा वारसा मिळाला. शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नोकरी करत कुटुंबही सांभाळले आणि पदवीपासून ‘एल.एल.बी.’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत संघर्षमय, पण तितकाच शिकवणारा होता.
 
हणमंत यांच्या आयुष्यातील विशेष प्रसंग म्हणजे, त्यांनी शिक्षण घेत असतानाच नोकरी आणि कुटुंब या दोन्ही जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडल्या. इतकंच नव्हे, तर त्यांनी सुरक्षित सरकारी नोकरीचा राजीनामा देत व्यवसाय करण्याचं धाडस दाखवलं आणि आज त्याच धाडसामुळे ते एक यशस्वी वकील म्हणून नावारूपास आले आहेत. वकिली व्यवसाय सुरू करताना त्यांच्या परममित्र अ‍ॅड. प्रणील गाढवे यांनी दिलेलं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांच्या यशाचा पाया ठरलं. गेल्या आठ वर्षांपासून वकिली क्षेत्रात काम करताना त्यांनी असंख्य सामान्य माणसांचे प्रश्न न्यायालयापर्यंत पोहोचवले. त्यांच्या मते, वकील म्हणजे फक्त खटले लढवणारा नव्हे, तर तो न्यायाचा सेतू असतो. म्हणूनच ते आपल्या अशीलांना न्याय मिळवून देताना केवळ कायद्यानं नव्हे, तर माणुसकीनं वागतात. न्याय मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमीतकमी कसा राहील, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
 
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक विशेष पैलू म्हणजे, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’च्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आहे. "वकिली ही माझी व्यावसायिक ओळख असली, तरी समाजातील दुःख पाहून मी कधीही नुसता प्रेक्षक राहू शकलो नाही,” असं ते सांगतात.
सामाजिक क्षेत्रात कार्य करताना त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. समाजातील शोषित, पीडित व्यक्तींवर जो अन्याय करेल, त्याच्याविरुद्ध संघर्ष करत राहणं, हे माझं कर्तव्य आहे, असं ते ठामपणे सांगतात. त्यांच्या या विचारांमुळे अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्यात सामाजिक जाणिवेचं भान, न्यायाची ओढ आणि बदलाची तळमळ दिसते.
 
अलीकडेच त्यांची ‘दि कुर्ला नागरिक बँके’च्या ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटी’वर सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक आणि लोकाभिमुख आहे. वकिली व्यवसाय, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्र या तीनही क्षेत्रांमध्ये त्यांनी एक संतुलन राखले आहे. हे संतुलनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं बलस्थान आहे. ते सांगतात, "भविष्यात समाजात कुठेही गरीब, शोषित, पीडित व्यक्तींवर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी उभा राहीन.” या वायातच त्यांचा संपूर्ण जीवनार्थ सामावलेला आहे.
 
हणमंत झिमल यांच्या वाटचालीत एक प्रकारचं सत्त्व आहे. ते म्हणजे, स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी जगण्याचं. त्यांच्या प्रयत्नात, बोलण्यात आणि कामात एक अस्सल प्रामाणिकपणा आहे. त्यांचा प्रवास म्हणजे संघर्षातून साधलेली प्रतिष्ठा. न्यायासाठी चाललेला हा प्रवास केवळ न्यायालयाच्या चार भिंतीत मर्यादित नाही, तर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचणारा आहे आणि म्हणूनच अ‍ॅड. हणमंत झिमल हे नाव आज ‘न्यायपथावरील हणमंत’ म्हणून ओळखलं जातं. जो समाजात समता, न्याय आणि माणुसकी यांचा दीप प्रज्वलित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
 
न्यायपथावरील त्यांचा प्रवास म्हणजे केवळ व्यावसायिक वाटचाल नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची प्रतिज्ञा आहे. ते म्हणतात, "मी वकील आहे, पण त्यापेक्षा मोठं माझं ध्येय आहे ते म्हणजे, समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय मिळावा.” हीच विचारधारा त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. त्यांच्या या वाटचालीकडे पाहताना जाणवतं की, एका व्यक्तीचा संघर्ष आणि प्रामाणिक प्रयत्न समाजात परिवर्तनाचा दिवा पेटवू शकतो. अ‍ॅड. हणमंत झिमल यांचा प्रवास म्हणजे अशा उजेडाचा प्रवास जो आजही नव्या पिढीला जिद्दीची, प्रामाणिकतेची आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देतो.

- सागर देवरे