नवी मुंबई : माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माथाडी समाजाच्या व्यथा समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी माथाडी कामगार मेळाव्याचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर शासन गंभीरपणे विचार करीत आहे. बनावट माथाडींमुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात आहेत.या मेळाव्याच्या निमित्ताने संघटनेचे सरचिटणीस तथा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या मागण्या व समस्या मांडल्या. माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, शशिकांत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मराठा समाजाचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविणार
आमदार नरेंद्र पाटील यांनी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर आतापर्यंत 70 हजार मराठा समाजातील नवउद्योजक तयार केले. या माध्यमातून तब्बल पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत या नवउद्योजकांना देण्यात आली. या उद्योजकांवर व्याजाचा बोजा पडू नये, यासाठी 560 कोटींचा व्याज परतावा महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आयएएस आयपीएस झाले, अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या मदतीमुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जावू शकले, स्व.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा संघर्ष केला. हा विषय आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. हे शासन मराठा समाजाचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
माथाडी कायद्याचा दुरुपयोग करणार्यांना जेरबंद केल्यास आपल्या माथाडी कामगार बांधवांना दोन पैसे जास्तच मिळतील. माथाडी चळवळीला बदनाम करणार्याविरुद्ध कारवाईसाठी काळानुरुप माथाडी कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. ते करताना या कायद्याचा आत्मा बदलणार नाही.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री