नवी दिल्ली : नारी शक्ती वंदन विधेयक पारित झाल्यानंतर दि. २२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहचलेत. त्यावेळी त्यांचे भाजपच्या महिला मोर्चाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले,"आज प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास गगनाला भिडत आहे, ती आनंदोत्सव साजरा करत आहे. ती आम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे. महिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचे भाग्य भाजपला लाभले आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आला आहे.हा सामान्य कायदा नाही. भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षातील एक मोठा निर्णय आहे. त्या विधेयकामुळे महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे मोदींनी सांगितले.
पुढे पीएम मोदींनी आपल्या भाषणात म्हटले, "आज मी देशाच्या प्रत्येक माता, बहिणी आणि मुलीचे अभिनंदन करतो. 20-21 सप्टेंबर रोजी आपण सर्वांनी एक नवा इतिहास घडताना पाहिला. आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला इतिहास घडवण्याची संधी मिळाली. या दिवसाची अनेक पिढ्यांपिढ्या चर्चा होईल. नारी शक्ती वंदन कायदा लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड बहुमताने मंजूर व्हावा अशी माझी इच्छा आहे.
तसेच पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, "हे महिला आरक्षण विधेयक मी आणलं नाही, हे तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालं आहे. यांच श्रेय हे करोडो देशवासीयाचे आहे. त्यामुळेच आज सरकार हा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकले. आणि 30 वर्षांपासून प्रलंबित असलेले विधेयक मंजूर झाले."