नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारताचा दौरा करणार आहेत, अशी माहिती सध्या रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी गुरुवारी दिली. मात्र, या दौऱ्याची नेमकी तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.
डोवाल यांनी सांगितले की, भारत आणि रशियामध्ये दीर्घकालीन व विशेष संबंध आहेत. या संबंधांना आम्ही मोठे महत्त्व देतो. दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय संवाद आणि सहकार्याची परंपरा राहिली आहे, आणि त्यामुळे आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीबाबत डोवाल म्हणाले, या भेटीबाबत आम्ही खूप आनंदी आणि उत्साही आहोत. दौऱ्याच्या तारखा आता जवळपास निश्चित झाल्या आहेत.
पुतिन यांचा प्रस्तावित भारत दौरा अशा वेळी होणार आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ युद्धामुळे तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकतर्फीपणे ५० टक्के आयात शुल्क लावले आहे. बुधवारी ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली असून, यापैकी मागील टप्प्यातील २५ टक्के कर गुरुवारपासून लागू झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर पुतिन यांची भारत भेट रणनीतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारत-रशिया भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी ही भेट निर्णायक ठरू शकते.