उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदी व नड्डांकडे - रालोआ नेत्यांचा निर्णय

    07-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली
:  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) घटक पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभेतील सभागृह नेते जगतप्रकाश नड्डा यांना उमेदवार निवडण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांसी बोलताना सांगितले की, रालोआच्या सर्व घटक पक्षांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगतप्रकाश नड्डा यांना उमेदवार ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, तो सर्व पक्षांना मान्य असेल.

उपराष्ट्रपती निवडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट असून, मतदान व मतमोजणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराचे नाव ठरवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक मानली जात आहे. रालोआकडून लवकरच अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.