नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे देशात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांद्वारे मतांची चोरी होत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगास लक्ष्य करून निवडणुकांमध्ये "मतांची चोरी" असल्याचा आरोप केला. कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १,००,२५० मतांची चोरी झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून करण्यात आलेले कथित संशोधन सादर करताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणुका कोरिओग्राफ केल्या जात आहेत. आम्हाला अंतर्गत अंदाज होता की आम्ही कर्नाटकमध्ये १६ जागा जिंकू, त्यातील ९ जागा आम्ही जिंकल्या. उरलेल्या ७ जागांमध्ये पराभवाची कारणे आम्ही शोधली. त्यात महादेवपुरा विधानसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या २०२४ मधील अधिकृत आकडेवारीचा दाखला देत सांगितले की, संपूर्ण लोकसभा मतदारसंघात ६.२६ लाख मते मिळाली, तर भाजपला ६,५८,९१५ मते मिळाली आणि त्यांनी ३२,७०७ मतांनी विजय मिळवला. मात्र महादेवपुरा मतदारसंघात काँग्रेसला १,१५,५८६ तर भाजपला २,२९,६३२ मतें मिळाली. महादेवपुरा ही एकमेव जागा आहे जेथे भाजपला मोठा विजय मिळाला आणि त्यामुळेच त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आघाडी घेतली.
राहुल गांधी यांनी पाच वेगवेगळ्या पद्धतीने मतदान प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप केला. डुप्लिकेट मतदार, बनावट पत्ते, एका इमारतीत असंख्य मतदार दाखवले गेले असून प्रत्यक्षात तिथे फक्त एक कुटुंब राहत असल्याचं त्यांनी नमूद केले. तसेच बोगस फोटो, फॉर्म ६ चा गैरवापर करून मतदार नोंदणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पाच महिन्यांत जेवढे मतदार नोंदवले गेले, ते मागील पाच वर्षांच्या तुलनेत जास्त असल्याचेही राहुल गांधी यांनी नमूद केले. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार यादीत नोंदवले गेले. संध्याकाळी पाचनंतर अचानक मतदानाचा टक्का प्रचंड वाढला. लोकसभेत आमची आघाडी विजयी झाली तर विधानसभेत तीच आघाडी साफ पराभूत झाली. एका राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जवळपास १ कोटी नव्या मतदारांची भर पडली, असा आरोप त्यांनी केला.