मुंबई : भारताच्या चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगला आता जवळपास एक महिना पुर्ण होत असून उद्याचा दिवस या मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुन्हा सुर्य उगवणार आहे. त्यामुळे उद्या इस्त्रोकडून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
२३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण पार पडले. त्यानंतर पुढचे १४ दिवस विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास केला. १४ दिवसानंतर चंद्रावर रात्र झाल्याने विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरने आपले काम थांबवले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रावर सुर्योदय होणार असल्याने चांद्रयान-३ पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पूर्ण तयारी केली आहे. ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास हे इस्त्रोचे मोठे यश असेल.
चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरले होते त्याला शिवशक्ती पॉईंट असे नाव देण्यात आले आहे. या शिवशक्ती पॉईंटवर लँडर उद्या पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी २२ सप्टेंबर रोजी विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर ही दोन्ही उपकरणे सहज कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.