मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील देखणा आणि उत्तम नृत्य करणारा हिरो अशी ख्याती असणाऱ्या हृतिक रोशनचा ‘कोई मिल गया’ चित्रपट आणि त्यातील जादू म्हणजे लहानग्यांसाठी मोठी पर्वणीच होता. ८ ऑगस्ट रोजी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल २० वर्ष पुर्ण होणार आहेत. या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, पीव्हीआर आयनॉक्स हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील एका पात्रावर चित्रपटांचे भाग पहिल्यांदाच बनवले गेले होते. ‘कोई मिल गया’मध्ये हृतिक रोशन, प्रिती झिंटा, रेखा, रजत बेदी, प्रेम चोप्रा आणि हंसिका मोटवानी या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.
चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ‘कोई मिल गया’ पुन्हा प्रदर्शित करण्याबाबत माहिती दिली असून ते म्हणाले की, हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्सच्या टीमने संपर्क साधला होता. आणि मी देखील लगेचच होकार दिला. चित्रपटाच्या निर्मितीबद्दल ते म्हणाले की, “आम्हाला ‘कोई मिल गया’ हा लहान मुलांच्या चित्रपटासारखा बनवायचा होता. ज्याचा आनंद मुले आणि त्यांचे कुटुंब दोघेही घेऊ शकतात. एलियन्सवर सायन्स फिक्शन फिल्म बनवणं हा चित्रपट निर्माता म्हणून मी घेतलेला जोखमीचा निर्णय होता. पण त्या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. या चित्रपटाच्या यशामुळे विविध शैलीतील चित्रपट बनवण्याचा आणि प्रयोगशील असण्याचा माझा विश्वास अधिकच दृढ झाला आहे.”
दरम्यान, जादू हे पात्र आणि त्यातून तयार झालेल्या या चित्रपटाच्या श्रृंखलेने सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे अनेक वर्ष मनोरंजन केले. ‘कोई मिल गया’ या चित्रपटापासून सुरु झालेला हा प्रवास क्रिश आणि क्रिश ३ या चित्रपटांपर्यंत आला. आता 'क्रिश ४' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटावर काही दिवसांपासून काम सुरू असल्याची माहिती स्वत: ह्रतिक रोशनने दिली आहे. यापूर्वी, हृतिकने स्पष्ट केले होते की त्याच्या सर्वात प्रसिद्ध क्रिश फ्रेंचायझीचा चौथा भाग ट्रॅकवर आहे. आता त्याचे वडील आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट शेअर केली आहे. राकेश रोशन म्हणाले की, 'क्रिश ४' फ्रँचायझीचा सर्वात मोठा चित्रपट असेल. कोविडनंतर बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवरील चढ-उतारांनी त्यांना चिंतेत टाकले होते, तरीही राकेश रोशनला त्यांच्या या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.