मुंबई : खासदार संजय राऊतांचे बंधु, आमदार सुनील राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेतच पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे. असं सुनील राऊत म्हणाले आहेत. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असंही सुनील राऊत म्हणालेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, "संजय राऊत यांनी जर गुडघे टेकले असते. तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हतं. ते जेलमध्ये असताना साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळं काही सहन केलं परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. सोडणारही नाही. आमचीच माणसं विकत घेऊन जातात. आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभं करतात. मला एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर 35 कोटींचं कर्ज आहे. 35 कोटींची काम केली पण सरकार मला पैसे देत नाही." असं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांनी सुनील राऊत यांच्या काही गोष्टी पटत नसल्याचं सांगितलं होतं. याला प्रत्त्युत्तर देताना सुनील राऊत म्हणाले, "१० दिवसांपूर्वी उपेंद्र सावंत मला म्हणाला की, मला सुद्धा ऑफर आहे. निधी करिता १५ कोटी आणि पाच कोटी कॅशची ऑफर आहे. त्यावेळी तो मला म्हणाला मी निष्ठावंत आहे मी घरी बसेल पण मी शिंदेगटात जाणार नाही. नंतर मी त्याला खूप फोन केले. पण त्याने माझे फोन घेतले नाहीत. नंतर मी त्याच्या बहिणीला फोन केला आणि मी तिला म्हणालो की मी नसतो तर तो आज जेलमध्ये असता. माझ्याकडे त्याच्या चार ते पाच क्लिप आशा आहेत की त्या जर मी सोशल मीडियावर टाकल्या तर तो आपल्या मुलीला आणि बायकोला तोंडदेखील दाखवणार नाही. परंतु अशा गोष्टी करणे योग्य नाही हे आम्हाला कळतं. मी उद्धव साहेबांना फोन लावला आणि त्यांना एक मेसेज पाठवला पंधरा कोटीचा फंड आणि पाच कोटी कॅशवर उपेंद्र सावंत पक्ष सोडून चालला आहे." असं सुनील राऊत म्हणालेत.