नवी दिल्ली : नूंह येथील हिंसाचारावर आता भाजपने काँग्रेसवर आरोप केले आहेत. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी दि. ३ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या एका आमदाराने प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्रिवेदी म्हणाले, काँग्रेस आमदाराची फेसबुक पोस्ट हिंसा भडकवणारी आहे. त्यामुळे हा हिंसाचार एका मोठ्या कटाचा भाग असल्याची शंका निर्माण होते, असे ही त्रिवेदी म्हणाले. त्यामुळे दिल्लीत ताहीर हुसैन होता, तसा मेवातमध्ये मामन खान आहे आणि तो कॉग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतो हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान या हिंसाचारावर पोलीस कारवाई करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांवर एफआयआर नोंदवले आहे. याशिवाय आठ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सरकार भरपाई देईल, परंतु खाजगी मालमत्तेचे झालेले नुकसान गैरप्रकार करणाऱ्यांकडून वसूल केले जाईल. सीएम खट्टर म्हणाले की, पोलीस सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत. हिंसाचाराच्या सूत्रधारांची ओळख पटवली जात आहे.
नूंह जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत, एसपी वरुण सिंगला यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, सुरुवातीच्या घटनेनंतर कोणताही हिंसाचार झाला नाही. सर्व भागात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या १४ कंपन्या बाहेरून मागवण्यात आल्या आहेत, तर राज्य पोलिसांच्या २१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत चार नवीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.