केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये एक लाख जागा रिक्त! लवकरच निघणार मोठी भरती; सरकारची संसदेत माहिती
03-Aug-2023
Total Views | 39
नवी दिल्ली : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांसारख्या केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये १,१४,२४५ पदे रिक्त आहेत. तसेच, अजय मिश्रा म्हणाले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत.
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि केंद्रीय पोलीस दल यांचा समावेश होतो. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लेखी उत्तरात सांगितले की, दिल्ली पोलिसांसह, सध्या सुमारे १,१४,२४५ पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांपैकी ३,०७५ गट 'अ', १५,८६१ गट 'ब' आणि ९५,३०९ गट 'क' मध्ये आहेत. त्यापैकी १६,३५६ पदे अनुसूचित जातीसाठी, ८,७५९ अनुसूचित जमातीसाठी, २१,९७४ इतर मागासवर्गीयांसाठी, ७,३९४ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि ५९,७६२ पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.
अजय कुमार मिश्रा म्हणाले की, रिक्त पदांवर भरती ही एक सतत प्रक्रिया आहे आणि जेव्हा जागा रिक्त होतात. तेव्हा पदे भरण्यासाठी जाहिराती प्रकाशित केल्या जातात आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती पत्र जारी केले जातात. तसेच रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.