पक्षीजगत मधील पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच. पक्षीनिरीक्षण करताना अनेक पद्धती वापरता येतात. एखादा विशिष्ट परिसर निवडून त्यात पक्षीनिरीक्षण म्हणजेच 'Patch Birding’ बद्दल सांगणारा आजचा हा लेख...
'जाऊ पक्ष्यांच्या गावा’ हा पक्षीजगतमधील पहिला भाग वाचून तुम्ही पक्षीनिरीक्षण सुरू केले असेलच. पण, पक्षीनिरीक्षणातून पक्षीसंवर्धन आणि पर्यायाने निसर्ग संवर्धन करावयाचे असेल, तर पक्षीनिरीक्षणात सातत्य असणे गरजेचे असते. हे सातत्य पँच बर्डिंग किंवा परिसर पक्षीनिरीक्षणातून आपसुकच येत असते.
परिसर पक्षीनिरीक्षणासाठी काय गरजेचे आहे? पहिलं म्हणजे पक्षीनिरीक्षक म्हणून दुर्दम्य इच्छाशक्ती म्हणजे आपण स्वतः आणि दुसरं म्हणजे एखादा ठरावीक परिसर. आता एक सामान्य प्रश्न तुम्हांस पडू शकतो की परिसर कसा निवडायचा? आपल्याला रोजच्या रहाटगाडग्यात दररोजच पक्षीअभायरण्य, जंगले, तलाव, पाणवठे अशा हमखास पक्षी आढळणार्या ठिकाणांवर जाणे जमत नाही. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी आपण नोकरीधंद्याच्या ठिकाणी जातोच. यासाठी आपल्या रोजच्या जीवनाचे एक २४तासांचे घड्याळ आपण ठरविलेले असते. या २४ तासांत आपण आपले राहाण्याचे ठिकाण, कामाचे ठिकाण आणि घर ते कार्यालय असे वावरत असतो. पक्षीनिरीक्षणासाठी यातील एक किंवा एकापेक्षा जास्त जागा निवडता येतात. यातील ठरावीक जागा निवडून कमीत कमी १५ मिनिटे पक्षीनिरीक्षणासाठी द्यायला सुरुवात करा. ठरावीक वेळी, ठरावीक ठिकाणी, ठरावीक मर्यादेतच परिसर पक्षीनिरीक्षण करून त्यांच्या नोंदी करायच्या असतात.
एकदा पक्षीनिरीक्षणासाठी परिसर निश्चित झाला की, आपण आपल्याकडे असलेली ज्ञानेंद्रिये वापरायला सुरुवात करा. पक्षीनिरीक्षण व पक्षीअभ्यासाठी ही निसर्गाने मानवाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. सरावानंतर पहाट होताच बिछान्यातच पाच ते दहा पक्ष्यांची आपसुकच गाणी ऐकायला येऊ लागतात. या गाण्यांसोबतच तुमचा अभ्यास सुरू होत असतो. तांबडं फुटताच कोणती पक्षी प्रजाती दिसतेय याचा क्रम लावायला सुरुवात करायची आणि काही दिवस हा क्रम पडताळत राहिल्यास कोण आधी उठते आणि कोण उशिरा हेही कळू लागते.
स्थानिक पक्ष्यांचे आपल्यासारख्याच काही नियमित सवयी असतात. त्यांचे ठरावीक जागांवर बसणे, ठरावीक वेळी विविध आवाज काढणे, खाण्याच्या सवयी हे सारं हळूहळू ओळखीचे वाटू लागते. आपले आपल्या शेजार्यांशी जसे ऋणानुबंध किंवा रूसवा फुगवा असतो.तसेच, काहीसे नातेसंबध या पक्षी प्रजातींमध्ये ही बघायला मिळतात. हळूहळू काळानुरूप त्यांचे प्रेमसंबध, विणीचा हंगाम, पक्षीप्रजातींमधील मादीचे वेगळेपण किंवा महत्त्व याचीही माहिती होऊ लागते. पक्षीप्रजाती आणि त्याचे निसर्गातील इतर घटकांशी नाते कसे असते याचाही अभ्यास कधी सुरू होतो हे कळतच नाही. झाडे, फुलपाखरे, प्राणी, सरिसृप, कृमी किटक यांचे ही अस्तित्व जाणवू लागते. हा सगळा अभ्यास करण्यासाठी एक छदाम ही खिशातून निघत नाही. आहे की नाही निर्भेळ, बिनाखर्चाचा स्वर्गीय आनंद आणि आयुष्यभराचा छंद.
यानंतर मात्र हा छंद व्यसनामध्ये परावर्तित होऊ लागतो. पण असे व्यसन असणे नक्कीच शारीरिक-मानसिक प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी कामी येऊ शकते. परिसर पक्षीनिरीक्षण यानंतर शास्त्रीय अभ्यास करायला भाग पाडते आणि मग या पक्षी अभ्यासाचे विविध कंगोरे दिसू लागतात. प्राथमिक अभ्यासानंतर अनेक उपविषय हाताळता येऊ शकतात. जसे की पक्षीछायाचित्रण, चलचित्रण, आवाजांचा अभ्यास, गळलेल्या पिसांचा अभ्यास, पक्षी शरीरशास्त्र, पक्ष्यांचा जीवनक्रम, स्थलांतर, विणीचा हंगाम आणि त्यावेळचे त्यांचे वागणे, पक्ष्यांची अन्नसाखळी, पक्षीप्रजातींचे आपआपसातील नाते, पक्षी आणि निसर्गातील इतर घटके, पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिलु, पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यांचे महत्त्व, पक्षी आणि पिलांचे संगोपन, पक्ष्यांचा अधिवास, पक्ष्यांचे प्रथमोपचार यासारखे अनेक उपविषय अभ्यासाचा भाग बनू शकतात.
परिसर-पक्षीनिरीक्षणाने तुमच्या समोर पक्षीविश्वातील ज्ञानाचे भांडार उघडू लागते आणि या भांडाराचा विनियोग करण्याची वेळ जवळ येऊ लागते. आजच्या सामाजिक माध्यमांच्या युगात हे भांडार इतरांसोबत सहजच सामायिक करता येते. पक्षीअभ्यासक आपल्या या शास्त्रीय नोंदी "eBird', "iNaturalist' सारख्या जागतिक व्यासपीठावर सामायिक करत आहेत. या नोंदी भविष्यकाळात पक्षी आणि पर्यायाने निसर्ग संवर्धनासाठी वापरता येतील. पक्षीविषयक लेख, कविता, व्यंगचित्रे, ब्लॉग, तक्ते यातूनही परिसर-पक्षीनिरीक्षणाचा अनुभव इतरांसोबत सामायिककरता येतो. यातून समाजात पक्षीनिरीक्षण आणि संवर्धनाचा संदेश पोहोचविता येतो.
अशारितीने प्रत्येकाने आपल्या सभोवतालचा २२ किमीचा एक परिसर पक्षीअभ्यासासाठी घेतला, तर निसर्ग संवर्धनाचे काम आपोआपच होणार नाही का?
लक्ष्मीकांत नेवे