मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच नाही तर संपुर्ण हिंदी चित्रपटसृष्टीलाही मनोरंजनाची देणगी दिली आहे. या चित्रपटाचा जल्लोष रजनीकांत यांचे चाहते जगभरातून करत आहेत. एकीकडे चित्रपटाचे यश साजरे केले जात असताना दुसरीकडे रजनीकांत अयोध्येत जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “आज लखनौमध्ये असून उद्या म्हणजेच रविवार दि. २० ऑगस्ट रोजी अयोध्येत जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहेत”.
रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट देशभरात १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. दरम्यान, 'जेलर' या चित्रपटाचे पहिले नाव Thalaivar १६९ असे होते. मात्र त्यानंतर हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या मेकर्सने नाव बदलून जेलर ठेवले कारण त्यांना रजनीकांत यांना हा चित्रपट ट्रीब्युट म्हणून द्यायचा होता. आत्तापर्यंत रजनीकांत यांनी अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले असून त्यांची प्रमुख भूमिका असणारा जेलर हा चित्रपट त्यांचा १६९ वा चित्रपट आहे.