फाळणी-एक रक्तरंजित इतिहास

    13-Aug-2023
Total Views | 377
Article On India Pakistan Partition

आज दि. १४ ऑगस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे या ‘विभाजन विभीषिका दिना’ला फाळणीच्या वेदनांचे स्मरण केले जाते. त्यानिमित्ताने डॉ. गिरीश आफळे यांनी लिहिलेल्या आणि ‘भारतीय विचार साधना’द्वारे प्रकाशित होणार्‍या आगामी ‘व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही अंश...

फाळणी ही आपल्या देशाची भळभळती जखम आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं; पण ते खंडित स्वरुपात. त्यामुळे स्वातंत्र्याचा निर्भेळ आनंद आपण घेऊ शकलो नाही. दि. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्याचा जल्लोष करत असताना भारताचा एक खूप मोठा भाग रक्तरंजित इतिहास लिहीत होता. तत्कालीन पश्चिम पंजाब, सिंध, पूर्व बंगाल या प्रांतातून जीर्ण-शीर्ण झालेले, सर्व काही सोडून द्यावं लागलेले, निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे खंडित भारतात येत होते. या अवस्थेतही भारतात पोहोचलेले सुदैवी ठरले होते. कारण, अनेकांची निघण्यापूर्वीच किंवा प्रवासात कत्तल झालेली होती. अनेक आयाबहिणींना पळवून नेण्यात आलं होतं, तर अनेक आयाबहिणींनी मुस्लीम आक्रांतांच्या हाती लागण्यापेक्षा हौतात्म्य पत्करणं स्वीकारलं होतं. अनेक कोवळ्या जीवांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

हे सार भयानक होतं. अतिशय भयानक. मानवतेला काळीमा फासणारं. साधारण १२ ते १५ लाख लोक या फाळणीच्या दंगलींमध्ये मारले गेले होते. सुमारे दीड कोटी लोकांना आपलं सर्वस्व सोडून आपल्याच देशात विस्थापित व्हावं लागलं होतं. यात बहुसंख्य हिंदू होते. हा सारा रक्तलांच्छित इतिहास स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढे येऊ दिला गेला नाही. हे अगदी ठरवून केलं असं वाटावं, असं सारं वातावरण होतं. त्यामुळे हळूहळू हा इतिहास मागे पडत चालला होता. नवीन पिढीला फाळणी, त्यामुळे भारताने सोसलेले दाहक चटके, विस्थापित झालेले परिवार, आपल्यापासून दुरावलेली आपली ’श्रद्धास्थानं’ या सार्‍यांचा विसर पडत चालला होता. कोणत्याही स्वयंपूर्ण राष्ट्रामध्ये, अशा प्रकारचा इतिहास विसरणं, हे योग्य नाही. जर्मनीमध्ये हिटलरचं नाव घ्यायलाही बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी आपण ’हिटलर’ हा शब्दही उच्चारू शकत नाही. त्याचं साहित्यही राजरोसपणे विकलं जात नाही. मात्र, तरीही जर्मनांनी दुसर्‍या विश्वयुद्धाचा इतिहास, कॉन्सट्रेशन कॅम्पस, त्या काळातील कागदपत्र, वर्तमानपत्राची कात्रण,वस्तू इत्यादी सर्व नीट जपून ठेवलं आहे.

दुर्दैवाने आपल्या देशात फाळणीवर संग्रहालय, तर सोडाच; पण प्रामाणिक लेखनसुद्धा फारसं झालेलं नाही आणि म्हणून डॉ. गिरीश आफळे यांनी लिहिलेलं, ’व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ हे पुस्तक फार मोलाचं आणि महत्त्वाचं ठरतं. या पुस्तकात गिरीशजींनी फाळणीच्या कारणांचा, फाळणीच्या घटनांचा आणि फाळणीच्या परिणामांचा विस्तृत आढावा घेतला आहे आणि हे सर्व तथ्यात्मक आहे. उपलब्ध संदर्भांचा आधार घेत त्यांनी, हे लेखन केलेलं आहे. १९३३ साली लंडनला इंग्रजांनी गोलमेज परिषद बोलावली होती. त्यावेळेस लंडनलाच शिकत असणार्‍या रहमत अलीने एक पत्रक काढलं. त्याचं शीर्षक होतं, 'Now or Never - Are we to live or perish forever?' या पत्रकात सर्वप्रथम वेगळ्या इस्लामी राज्याची, अर्थात पाकिस्तानची, कल्पना केली होती. मात्र, गोलमेज परिषदेला आलेल्या सर्वांनी या पत्रकाला केराच्या टोपलीत टाकलं. जिनांनीही या कल्पनेला (irrelevant) असंबद्ध म्हणून बाजूला सारलं. मग १९४० साली असं काय घडलं की, ‘मुस्लीम लीग’च्या लाहोर अधिवेशनात खुद्द जिनांनीच वेगळ्या मुस्लीम राष्ट्राचा ठराव मांडला? (त्यांनी ‘पाकिस्तान’ हा शब्द न वापरता ‘ईस्टर्न झोन’ हा शब्दप्रयोग केला). जिनांनी सार्वजनिकरित्या सर्वात पहिले पाकिस्तानचा उच्चार केला, १९४३ साली. (रहमत अलीच्या त्या पत्रकानंतर तब्बल दहा वर्षांनी!)

१९३३च्या नंतर भारतात मुस्लीम आक्रमकता वाढलेली दिसते. मुसलमान-हिंदू दंग्यांचं प्रमाणही वाढलंय आणि याचबरोबर वाढलंय, काँग्रेसने सुरू केलेलं मुस्लीम तुष्टीकरण. विशेषतः महात्मा गांधींनी ‘खिलाफत आंदोलना’ला समर्थन दिल्यापासून त्यांची अधिकांश वक्तव्य किंवा त्यांनी लिहिलेले अधिकांश लेख हे मुस्लीम तुष्टीकरणाला बळ देणारेच आहेत.साधारण १९२० ते १९४७ हा २७ वर्षांचा प्रवास म्हणजे मुस्लीम आक्रमकतेचा आणि काँग्रेसने केलेल्या मुस्लीम लांगूलचालनाचाच इतिहास आहे. या सर्व काळात काँग्रेसने मुस्लीम अनुनयाची पराकाष्ठा केलेली दिसते. त्यामुळे मदन मोहन मालवीय, राजश्री पुरुषोत्तमदास टंडन यांच्यासारखे हुशार आणि प्रतिभाशाली नेते स्वातंत्र्य मिळेपर्यंत कधी काँग्रेसच्या निर्णय घेणार्‍या समूहात येऊ शकले नाहीत. उलट काँग्रेसच्या पाठीशीही मुसलमान आहेत, हे दाखवण्यासाठी काँग्रेसने कोणते नेते उभे केले, तर मौलाना अब्दुल कलाम आझादांसारखे. मौलाना आझाद हे काँग्रेसचे ‘पोस्टर बॉय’ होते.

जिनांना शह देण्यासाठी उभे केलेले. कोण होते, हे मौलाना आझाद? यांचे पूर्वज अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातले एक उमराव होते. बाबरच्या फौजेबरोबर ते आक्रांताच्या रुपात भारतात आले होते. खुद्द मौलाना आझादांचे वडील, १८५७च्या क्रांतियुद्धाच्या वेळेस मक्केला पळून गेले होते. तिथल्याच एका स्त्रीशी त्यांनी विवाह केला. मौलानांच्या या आईला हिंदी तर सोडा, उर्दू भाषासुद्धा प्रारंभी येत नव्हती. फक्त फारसी. या मौलानांचे सर्व शिक्षण मदरसामध्ये झाले. मोठा झाल्यावर यांनी ‘अल्-हिलाल’ आणि ‘अल-बलाघ’ ही दोन रॅडिकल इस्लामी साप्ताहिकं काढली. अलीगढच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे हे संस्थापक सदस्य. खिलाफत आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ. हे असे मौलाना आझाद काँग्रेसच्या पहिल्या फळीचे नेते होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे ११ वर्षं, हे गृहस्थ स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. आपल्याला चुकीचा किंवा विकृत इतिहास का शिकवला गेला, याचं हे एक कारण आहे!

गंमत म्हणजे, इतकं सर्व लांगूलचालन करूनही मुसलमान काँग्रेसच्या बाजूने होते का? तर उत्तर आहे-नाही. गिरीशजींनी या पुस्तकात त्या काळात झालेल्या निवडणूक निकालांची जंत्रीच दिलेली आहे. १९४५च्या केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीत, मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या ३२ पैकी ३२ जागांवर ’मुस्लीम लीग’ विजयी ठरली. काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. गांधीजींनी अनेक प्रसंगी मुस्लिमांची पाठराखण केली होती. दंग्यांमध्ये मुस्लीम आक्रमणाचे पुरावे समोर दिसत असूनही त्यांनी एकाही प्रसंगी मुस्लिमांची किंवा मुस्लीम नेतृत्वाची निभर्त्सना केल्याचं उदाहरण नाही. स्वतः त्यांची इच्छा, स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात जाऊन राहण्याची होती. त्यांच्या लाहोरच्या एक दिवसाच्या दौर्‍याची माहिती देताना मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडियाने’ आपल्या दि. ८ ऑगस्ट १९४७च्या अंकातील बातमीचे शीर्षकच केले होते, ’ची. 'Mr. Gandhi To spend Rest of His Days in Pakistan.' पण, गांधीजींचे दुर्दैव असे की, राष्ट्रपती जिना किंवा पंतप्रधान लियाकत अलींचे तर सोडूनच द्या; पण पाकिस्तानातल्या एखाद्या गल्लीतल्या लहानश्या, छुटभैय्या नेत्यानेही गांधीजींना पाकिस्तानात आमंत्रित केले नाही!

पाकिस्तानबाबत व्यावहारिक दृष्टिकोन घेणारे नेते होते-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा पाकिस्तान हा शब्दफारसा प्रचारात नव्हता, जिनांनी ज्याचा जाहीरपणे उच्चारही केला नव्हता, त्या पाकिस्तानावर त्यांनी डिसेंबर १९४० साली पुस्तक प्रकाशित केले. शीर्षक होते- "Thoughts on Pakistan. या पुस्तकात डॉक्टर आंबेडकरांनी ठामपणे मांडलेला मुद्दा होता, हिंदू-मुस्लीम सह अस्तित्व शक्यच नाही. त्यामुळे पाकिस्तान होऊ देणे योग्य आहे. मात्र, देशाची ही फाळणी होताना लोकसंख्येची अदलाबदल आवश्यक आहे’. या मुद्द्यावर बाबासाहेब त्यांच्या मृत्यूपर्यंत ठाम राहिले. या पुस्तकात बाबासाहेबांनी मुसलमानांना चक्क ’शाप’ (curse) म्हटले आहे. त्यांचे प्रतिपादन होते की, ‘फाळणीमुळे भारताला लागलेला हा शाप दूर होतोय, ही चांगली गोष्ट आहे.’ याच काळात हिंदू महासभेची आणि काँग्रेसची भूमिकासुद्धा अखंड हिंदुस्थानाची होती. १९४५च्या केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसने अखंड हिंदुस्थानाची भूमिका घेऊनच निवडणूक लढवली होती.

मग काँग्रेसच्या धोरणात अचानक बदल कसा झाला?

’मुस्लीम लीग’ने स्वातंत्र्यापूर्वीच्या पाच-सहा वर्षांत प्रचंड आक्रमकतेचे धोरण राबवलेले होते. हिंदूंवर आक्रमण, हे त्यांचं देशभरातलं सूत्र होतं. या दंग्यांमधून हिंदूंवर सतत मानसिक दबाव टाकत राहायचं, या हेतूनेच त्यांच्या सर्व कारवाया होत्या. दुर्दैवाने इंग्रज हे मुसलमानांच्या बाजूचे होते. त्यांना भारत सोडण्यापूर्वी या विशाल देशाला दोन-तीन तुकड्यांमध्ये विभाजित करणं आवश्यक वाटत होतं. खुद्द अमेरिकेचाही तोच सल्ला होता. या दोस्त राष्ट्रांनी हेच मॉडेल दोनच वर्षांपूर्वी जर्मनीत करून बघितलं होतं. ‘सामर्थ्यशाली जर्मनीला शक्तिहीन करायचं असेल, तर त्याचं विभाजन करा,’ हे सरळ सोपं सूत्र होतं. त्याप्रमाणे अमेरिका आणि रशियाने जर्मनीला वाटून घेतलं होतं. त्याच धर्तीवर, भविष्यात भारत हा शक्तिशाली देश बनू नये, म्हणून भारताचं विभाजन त्यांना आवश्यक वाटत होतं आणि ’मुस्लीम लीग’शिवाय भारताचं विभाजन शक्य नव्हतं. म्हणून फाळणी-एक रक्तरंजित इतिहास माऊंटबॅटन असो की, जनरल अचिनलेक, या सर्व इंग्रजांचं झुकतं माप ‘मुस्लीम लीग’ला होतं. त्यामुळेच १९४७ मध्ये झालेल्या दंग्यांमध्ये पश्चिम पंजाब, सिंध, पूर्व बंगाल वगैरे सारख्या ठिकाणी हिंदूंना प्रशासनाची मदत मिळाली नाही.

मात्र, फाळणीसाठी काँग्रेस पक्ष तयार झाला, तो टर्निंग पॉईंट होता- दि. १६ ऑगस्ट १९४६. ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन डे.’ सुमारे दोन महिने आधीपासून जिनांसकट सर्व ’मुस्लीम लीग’चे नेते इशारा देत होते की, ‘फाळणीला मान्यता द्या, अन्यथा आम्ही काय आहोत, हे दाखवून देऊ’. दि. १६ ऑगस्टला त्यांनी ते दाखवलं. पाच हजारांपेक्षा जास्त हिंदूंना त्यांनी कोलकात्त्यात कापून काढलं. अक्षरशः रक्ताच्या नद्या वाहिल्या. त्याचीच पुनरावृत्ती पुढे दोन महिन्यांनी दि. १० ऑक्टोबरला ’मुस्लीम लीग’ने बंगालच्या चितगाव विभागातील नोवाखाली जिल्ह्यात केली. येथे तर कोलकात्त्यापेक्षाही भीषण रक्तपात झाला. सुमारे ३० ते ४० हजार हिंदू मारले गेले, असे अनुमान आहे. हे मात्र खरं की, नोव्हेंबर १९४६ नंतर नोवाखाली जिल्ह्यात हिंदू औषधालाही शिल्लक राहिला नाही.

मात्र, फाळणीला मान्यता देत असताना काँग्रेसने काही अक्षम्य चुका करून ठेवल्या. फाळणी ही मुस्लिमांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र मागण्यातून झाली, ही वस्तुस्थिती आहे. पण, असे असताना काँग्रेसने लोकसंख्या अदलाबदलीचे समर्थन तर सोडाच, चक्क विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ‘लोकसंख्येची अदलाबदल किती योग्य आहे,’ हे तर्कपूर्ण पद्धतीने समजावून सांगत होते. खुद्द जिना लोकसंख्येच्या अदलाबदलीसाठी आग्रही होते. देशभरात मुसलमानांनी काँग्रेसला नुसते नाकारलेच नव्हते, तर चक्क लाथाडले होते, अशा परिस्थितीत काँग्रेसने लोकसंख्या अदलाबदलीला विरोध करणं, हे नुसतं अनाकलनीय नव्हतं, तर ती एक भयंकर चूक होती.

एक प्रश्न मनात येतो की, ‘फाळणीच्या त्या सर्व धकाधकीच्या, गडबडीच्या, गोंधळाच्या आणि अराजकतेच्या काळात, देशात सर्वात मोठा आणि प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची काय भूमिका होती?’ अर्थात, त्या दंग्यांच्या काळात हिंदू-शिखांचा जीव वाचवण्याचे काही प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले होते की, प्रचंड संख्येत येणार्‍या निर्वासितांची काही सोय काँग्रेसने लावली? या निर्वासितांच्या निवार्‍याची, अन्न-वस्त्रांची काही व्यवस्था काँग्रेसने केली? त्यांच्यासाठी काही मदत शिबिरं उभारली? दुर्दैवाने या सर्व प्रश्नांची उत्तरं नकारात्मक आहेत. त्या काळात देशात प्रचंड मोठी राजकीय शक्ती असलेल्या काँग्रेसची, फाळणीच्या काळातही भूमिका, ही अगदीच नगण्य आहे. मात्र, त्या सर्व अस्थिरकाळात, सीमावर्ती भागात हिंदू-शिखांच्या बरोबर पहाडासारख्या कणखरपणे आणि खंबीरतेने उभे राहणारे संघटन होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. साधारणपणे १९४० ते १९४८ या आठ वर्षांत भारताच्या उत्तर-पश्चिम भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे फार मोठे शक्ती केंद्र होते. संघाच्या संघटित शक्तीमुळे अनेक हिंदू-शिखांचे प्राण वाचले आणि हे सर्व करत असताना संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी हौतात्म्य पत्करले. ’मुस्लीम नॅशनल गार्ड्स’ आणि इतर मुस्लीम गुंडांशी लढताना अनेक स्वयंसेवकांनी आपलं प्राणार्पण केलं.

जेव्हा दंगलग्रस्त सीमावर्ती भागात इतर कोणत्याही नेत्याची जाण्याची हिंमत होत नव्हती, तेव्हा संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजी दि. ५ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट १९४७ या काळात सिंध प्रांताच्या दौर्‍यावर होते. दि. १४ ऑगस्ट १९४७ ला, पाकिस्तानची स्थापना होण्याच्या दिवशीच, राष्ट्र सेविका समितीच्या तत्कालीन प्रमुख संचालिका वंदनीय मावशी केळकर या कराचीत सेविकांचा मेळावा घेत होत्या, त्यांना धीर देत होत्या. आज पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षं पूर्ण होत असताना खुद्द पाकिस्तानातच हा प्रश्न विचारला जातोय, ’आपण फाळणी का मागितली?’ या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. गिरीश आफळे यांचं ’व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ हे पुस्तक फार महत्त्वाचं ठरतं.

प्रशांत पोळ
९४२५१५५५५१

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121