महाराष्ट्राच्या ७२० किमी लांबीच्या कोकण किनार्यावरचा मासेमारी करणारा समाज पिढ्यान्पिढ्या समुद्राशी जुळवून घेत मासेमारी करीत आहे. परंतु, आता हवामान बदलाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामांमुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. हवामान बदलाचा मासेमारीवर परिणाम करणार्या चार प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख...
अरबी समुद्रातील तापमानवाढीमुळे महाराष्ट्रासह भारताच्या पश्चिम किनार्यावरील माशांच्या वितरणात मोठे बदल दिसून येत आहेत. १९६० सालापासून या भागात दर दशकाला ०.१२ ते ०.१३ अंश सेल्सिअस इतकी तापमानवाढ झाली आहे. यामुळे तारली आणि बांगडा सारख्या व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या माशांच्या प्रजाती केरळ आणि कर्नाटकच्या पाण्यातून महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्या आहेत. तर पापलेट सारख्या तळाशी राहणार्या माशांच्या प्रजाती उबदार पाण्यापासून दूर जाऊन खोल समुद्रात स्थलांतर करत आहे. याचबरोबर त्याचे काही पर्यावरणीय आणि आर्थिक परिणाम झाले आहेत ते पुढीलप्रमाणे. मत्स्यसंपत्तीचे उष्णकटिबंधीयकरण जसे की, महाराष्ट्राच्या समुद्रात पिवळा ट्युना/कुपा/गेदर सारख्या उष्णकटिबंधीय प्रजातींचे प्रमाण वाढत आहे. प्रजनन क्षेत्रांमधील बदल जसे की, केरळजवळील तारलीचे पारंपरिक प्रजनन क्षेत्रे उत्तरेकडे सरकली आहेत. संसाधनांवरील वाद जसे की, मासेमारीचे हक्क यावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात वाद निर्माण होत आहेत. त्याचबरोबर हवामान बदलाचे घटक इतर पद्धतीनेदेखील परिणाम करत आहेत.
माशांच्या स्थलांतरात होणारे बदल
जागतिक हवामान बदलामुळे समुद्राचे तापमान वाढत आहे. याचा माशांच्या वितरणावर आणि स्थलांतरावर मोठा परिणाम होत आहे. मासे हे एकतापी प्राणी असल्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान बाह्य परिस्थितीनुसार बदलते. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे अनेक माशांच्या प्रजाती आपल्या अनुकूल तापमानात राहण्यासाठी ध्रुवीय भागाकडे (उत्तर-दक्षिण) किंवा समुद्राच्या खोल भागाकडे स्थलांतर करत आहेत. सागरी प्रजाती दर दशकात सरासरी ५९ किमी या वेगाने ध्रुवाकडे सरकत आहेत, जे जमिनीवरील प्रजातींपेक्षा जास्त वेगवान आहे. या बदलामुळे पारंपरिक मत्स्यक्षेत्रांना धोका निर्माण झाला आहे. अटलांटिक कोड आणि बांगडासारख्या व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या माशांच्या प्रजाती उत्तरेकडे स्थलांतर करत आहेत. उष्णकटिबंधीय भागातील काही प्रजाती तेथून नामशेष होऊ शकतात, तर समशीतोष्ण भागात नवीन प्रजाती दिसू शकतात. समुद्री प्रवाह आणि माशांच्या अन्नाच्या उपलब्धतेत बदल झाल्यामुळे माशांचे प्रजनन क्षेत्रही बदलत आहे. या सर्व बदलांमुळे मत्स्यउद्योगावर आर्थिक आणि व्यवस्थापनाचे संकट निर्माण झाले आहे. मासेमारी समुदायांना नवीन स्थलांतरित माशांच्या साठ्याशी जुळवून घ्यावे लागत आहे.
मत्स्यसाठ्यातील घट
समुद्राच्या तापमानवाढीमुळे आणि समुद्राच्या आम्लीकरणामुळे भारताच्या पश्चिम किनार्यावर माशांच्या साठ्यात लक्षणीय घट दिसून येत आहे. संशोधनानुसार, २०१२-२०२२ या कालावधीत तारली, इंडियन ऑईल सार्डिनसारख्या प्रमुख व्यावसायिक प्रजातींच्या संख्येत २० ते ३० टक्के घट झाली आहे. लक्षद्वीपमधील कोरल रीफ इकोसिस्टम जे २५ टक्के समुद्री प्रजातींसाठी प्रजनन क्षेत्रे आहेत, त्यांना ६० टक्के ब्लीचिंगमुळे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील ऑसिजनची कमतरता असलेले क्षेत्र २००० सालापासून १५ टक्के वाढले आहे, यामुळे मासे अरुंद जागेत अडकून पडत आहेत. तसेच, याचा जैवविविधतेवरील साखळीदेखील परिणाम झाला आहे. अन्नसाखळीतील असंतुलन जसे की, अरबी समुद्रात फायटोप्लांटनच्या वनस्पती प्लवक उत्पादकतेत आठ टक्के घट झाली आहे, ज्यामुळे बारमुंडे, खजुरासारख्या छोट्या माशांच्या प्रजातींना अन्नाची कमतरता भासू लागली आहे. त्याचबरोबर आक्रमक प्रजातींचे वर्चस्व समुद्रात दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या समुद्रात जेलीफिशचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे, जे स्थानिक माशांशी स्पर्धा करत आहेत. आनुवंशिक घट जसे की, बॉम्बे डक / बोंबिलच्या लोकसंख्येमध्ये हवामान बदलामुळे आनुवंशिक बदलांची क्षमता कमी झाली आहे.
समुद्रपातळीवाढीचा वाढता धोका
भारताच्या पश्चिम किनार्यावर १९९८-२०१८ या कालावधीत चक्रीवादळांच्या संख्येत ५२ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनार्यावर २००० सालानंतर दरवर्षी ३-५ अधिक अतिवृष्टी (१५० मिमी/दिवस) घडू लागल्या आहेत. २०२१ सालामधील तौकते चक्रीवादळामुळे मत्स्यव्यवसायाच्या पायाभूत सुविधांना १५ हजार कोटी रुपये इतका नुकसान झाले आहे. याचबरोबर मत्स्यव्यवसायावर होणारे त्याचे विशिष्ट परिणाम समजून घेऊया. भौतिक, आर्थिक नुकसान जसे की, रत्नागिरीमधील ७८ टक्के लहान मच्छीमारी बोटी २०२०-२०२३ दरम्यानच्या तुफानांमध्ये नष्ट झाल्या. चक्रीवादळांनंतर एक्वाकल्चर, मत्स्यशेती तलावांमध्ये ४० टक्के जास्त खारट पाणी शिरले व नुकसान झाले. याचे पर्यावरणीय परिणाम काय ते पाहू. तुफानांमुळे नदीमुखांतील २५-३० टक्के लहान मासे वाहून गेले. सोबतच मुंबईच्या खाड्यांमध्ये ऑयस्टरच्या शिंपले, कालवे याच्या पिल्लांची संख्या ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. व्यावसायिक अडचणी जसे की, १९९० ते २०२० या कालावधीत दरवर्षी १५ ते ४५ दिवस मासेमारी बंद राहिली आहे.
समुद्री उत्पादकतेत बदल
समुद्री प्लवक विशेषता वनस्पती प्लवक हे सागरी अधिवासात प्रमुख भूमिका निभावतात. याला अनुसरून प्राथमिक उत्पादकतेत झालेली घट लक्षणीय आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम किनार्यावर महाराष्ट्रसहित फायटोप्लांटन, वनस्पती प्लवक उत्पादकतेत १९९८-२०१८ सालदरम्यान १५ टक्के घट दिसून आली आहे. हे प्रामुख्याने समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील ०.५ अंश वाढ आणि मान्सून पावसाच्या आकर्षणातील बदलांमुळे झाले आहे. ‘सीएमएफआरआय’च्या अहवालानुसार (२०२२), यामुळे महाराष्ट्रातील तारली आणि बांगडा यांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. उष्णकटिबंधीय प्रजाती जसे की, यलोफिन ट्युना महाराष्ट्राच्या किनार्याजवळ आढळू लागल्या आहेत. पारंपरिक प्रजाती उदा. बॉम्बे डक/बोंबिल उत्तरेकडे (महाराष्ट्राकडून वरती गुजरातच्या दिशेने) स्थलांतर करत आहेत. मुंबई समुद्रकिनार्यावर नत्रयुक्त पदार्थांचे प्रमाण २०००-२०२० दरम्यान ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे स्थानिक झूप्लांटन, प्राणी प्लवक संख्येवर परिणाम झाला आहे. रत्नागिरी समुद्री भागात जेलीफिशचे प्रमाण २०१० सालापासून ५० टक्क्यांनी वाढले आहे. सोबतच मँग्रोव्ह, कांदळवन जंगलांवर अवलंबून असलेल्या प्रजातींच्या संख्येत घट झाली आहे. याचा आर्थिक थेट परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील सागरी मत्स्य उत्पादनात २०१०-२०२० दरम्यान १८ टक्के घट (मत्स्य विभाग, महाराष्ट्र शासन, २०२३) झाली आहे.
प्रदीप चोगले
(लेखक सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
९०२९१४५१७७