मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या ओह माय गॉड २ चित्रपटाच्या टीझर आणि गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात काही नेटकऱ्यांनी सवयीप्रमाणे अक्षय कुमारला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर, चित्रपटाच्या मेकर्सने देखील सेन्सॉर बोर्डावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. जर बोर्डाने पूर्वीच प्रौढांसाठी असे प्रमाणपत्र दिले आहे तर आणखी कट्स करायला सांगण्याची गरजच काय आहे असा परखड प्रश्न त्यांनी थेट सेन्सॉरला विचारला आहे. त्यामुळे येत्या काळात ओमएमजीची अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.
ओएमजी चा पहिला भाग उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केला असून दुसरा भाग अमित राय यांनी केला आहे. दरम्यान, ओएमजी २ मध्ये २२ कट्स सुचवण्यात आले आहेत. याविषयी उमेश यांनी सांगितले की, या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ते खूपच संवेदनशील आहेत. मी त्यांच्या पूर्ण टीमचे कौतूकही करतो. त्यांनी खूप मेहनतीनं ही फिल्म तयार केली आहे. मी अजून काही ती फिल्म पाहिलेली नाही. त्यामुळे त्यावर बोलणं उचित ठरणार नाही. असेही उमेश यांनी म्हटले आहे.
या चित्रपटात अक्षयसोबत प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय आणि पंकज दुसऱ्यांदा एकत्रित काम करणार आहेत. यापूर्वी ते बच्चन पांडेमध्ये दिसले होते. OMG2 वरुन देखील सोशल मीडियावर वेगळ्या चर्चेला उधाण आले होते. त्यावरुन वादही झाला होता. भगवान शंकर यांचे चित्रिकरण, त्यांचे तांडव आणि रेल्वे स्टेशनवरील तो प्रसंग यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले होते.