सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत सर्वोत्तम केंद्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी
सेमीकॉन इंडिया - २०२३चे केले उद्घाटन
28-Jul-2023
Total Views | 47
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे सेमीकॉनइंडिया २०२३ परिषदेचे उद्घाटन केले. भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देणे ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
सेमिकॉन सारखे कार्यक्रम हे सॉफ्टवेअर अपडेटसारखे असतात जिथे तज्ञ आणि प्रमुख उद्योजक एकमेकांना भेटतात आणि परस्परांकडील ज्ञान, माहितीची देवाण घेवाण करतात, यावर पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना भर दिला. कार्यक्रमस्थळी असलेले प्रदर्शन बघून पंतप्रधान मोदींनी या क्षेत्रातील नवनवीन शोध आणि प्रज्ञेबद्दल आनंद व्यक्त केला. विशेषत: तरुण पिढीने सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाची ताकद समजून घ्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
भारताला आपल्या जागतिक जबाबदाऱ्या ठाऊक आहेत आणि मित्र देशांसोबत सर्वसमावेशक आराखड्यावर काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच भारत एक ऊर्जाशील सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करत आहे. अलिकडेच राष्ट्रीय क्वांटम अभियानाला मंजुरी देण्यात आली. तसेच नॅशनल रिसर्च फाऊंडेशन विधेयकही संसदेत मांडण्यात येणार आहे. सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्यासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सुधारणा केली जात आहे. भारतात अशी 300 हून अधिक नामांकित महाविद्यालये निवडण्यात आली आहेत, जिथे सेमीकंडक्टरचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील अशी माहिती त्यांनी दिली. चिप्स टू स्टार्टअप कार्यक्रम अभियंत्यांना मदत करेल. पुढील 5 वर्षांत आपल्या देशात एक लाखाहून अधिक डिझाइन इंजिनीअर्स तयार होतील असा अंदाज आहे. भारताच्या वाढत्या स्टार्ट-अप परिसंस्थेमुळे सेमीकंडक्टर क्षेत्राला बळकटी मिळणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.