वेगाने विकसित होणारे उत्तर प्रदेश

    21-Jul-2023
Total Views | 120
Editorial On UP moved out of BIMARU category

काही वर्षांपूर्वीपर्यंत उत्तर प्रदेश हे ‘बिमारू राज्य’ म्हणून ओळखले जात होते. त्याच उत्तर प्रदेशचा पूर्ण कायापालट सहा वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. राज्यातील ५.५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. देशातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ते विकसित होत आहे.

उत्तर प्रदेश हे राज्य हे अप्रामाणिक तसेच भ्रष्ट नेत्यांमुळे विकासापासून दूर होते. जातीयवाद, भ्रष्टाचार आणि भेदभाव यांमुळे येथे विकास होत नव्हता. राज्यातील ५.५ कोटी जनता गरिबीतून बाहेर आली आहे. ‘बिमारू राज्य’ असा लौकिक असलेले उत्तर प्रदेश आता देशातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ‘राज्य लोकसेवा आयोगा’ने निवडलेल्या ७०० नवनियुक्त अधिकार्‍यांच्या नियुक्ती पत्र वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सहा वर्षांपूर्वींपर्यंत उत्तर प्रदेशात भ्रष्ट व्यक्ती सत्तेवर होत्या, असा आरोप त्यांनी केला. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ आयोगानुसार उत्तर प्रदेशचा झपाट्याने विकास होत आहे. आर्थिक वाढ, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या बाबतीत पुढे येत आहे. तेथील दरडोई उत्पन्न दुप्पट झाले आहे. अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. उत्तर प्रदेशात विकास अतिशय वेगाने होत आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामात सुधारणा होत आहे. ‘गरीब कल्याण’ कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. तेथील सरकार, प्रशासन आणि शासकीय कर्मचारी यांच्या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशचा विकास होत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणतात. योगी आदित्यनाथ २०१७ पासून मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशात कार्यरत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेश ओळखले जाते. त्याचवेळी तेथील गरिबी हा चिंतेचा विषय. म्हणूनच योगी आदित्यनाथ यांनी गरिबी कशी कमी करता येईल, यावर भर दिला. तरुणांना कौशल्यांचे प्रशिक्षण देणारी ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणारी ‘दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना’, ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘जन धन योजना’ यांची त्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केली.

‘कौशल विकास’च्या माध्यमातून चार दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. ‘दीनदयाल उपाध्याय’अंतर्गत दोन दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण मिळाले. कृषी, पशुपालन, हस्तकला यांसारख्या स्वयंरोजगार कौशल्यांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत दोन दशलक्ष घरे उभारण्यात आली. ‘जन धन योजने’त उत्तर प्रदेशात १०० दशलक्ष बँक खाती उघडली गेली. जागतिक बँकेच्या मते, उत्तर प्रदेशातील गरिबी दर २०११ मध्ये ३२ टक्के इतका होता. तो २०२० पर्यंत २२ टक्के इतका लक्षणीयरित्या खाली आला. हे योगी आदित्यनाथ सरकारचे यश मानले जाते. त्याचबरोबर त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यावरही लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच आज उत्तर प्रदेश हे गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक पर्याय झाला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तेथील जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या धोरणांचा परिणाम म्हणून, उत्तर प्रदेश भारतातील सर्वात वेगाने वाढणार्‍या राज्यांपैकी एक झाले आहे. तसेच, राज्याची अर्थव्यवस्था सरासरी नऊ टक्के वेगाने वाढत आहे.

आगामी काही वर्षांत तिचा वेग लक्षणीयरित्या वाढेल, असे संकेत मिळत आहेत. अर्थातच निरक्षरता, तसेच गुन्हेगारीचे राज्यात असलेले जास्त प्रमाण याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तथापि, ते या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. यशस्वी मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ म्हणूनच ओळखले जातात. विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी राबवलेल्या उपाययोजना उल्लेखनीय अशाच. त्यामुळेच गुन्हेगारी दर कमी झाला असून, सामान्य जनतेला सुरक्षित वाटू लागले आहे. गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवणारे ‘बुलडोझर बाबा’ असाही त्यांचा लौकिक आहे. योगी यांच्या राज्यात ‘अटल मित्र’अंतर्गत ४० लाख घरे बांधण्यात आली. उत्तर प्रदेशातील शहरांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणार्‍या ‘स्मार्ट मिशी मिशन योजने’तून १०० शहरांचा विकास करण्यात आला आहे.

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत ९० टक्के गावांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत. ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत २० लाख जनतेला ‘डिजिटल’ साक्षरता देण्यात आली आहे. उद्योगांना प्रशिक्षण देणार्‍या उद्योग विकास योजनेतून एक हजार उद्योग उभारण्यात आले आहेत. ‘कृषी विकास योजने’तून दहा लाख शेतकरी बांधवांना कर्ज देण्यात आले आहे. तसेच, आरोग्य सुविधांचा विकास करण्यासाठीच्या ‘स्वास्थ्य सुविधा योजने’च्यामार्फत एक हजार नवीन रुग्णालये बांधण्यात आली आहेत. या योगी आदित्यनाथ यांनी राबविलेल्या काही योजना. त्यांचा गरिबी कमी करण्यासाठी, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी अर्थातच सकारात्मक परिणाम झाला आहे. एक समृद्ध तसेच विकसित राज्य म्हणून उत्तर प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. गुन्हेगारांना अजिबात दयामाया न दाखवणारे योगी म्हणूनच विरोधकांना रुचत नाहीत. त्यांच्यामुळे उत्तर प्रदेशात धार्मिक सहिष्णुता कमी झाली, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.

अर्थातच योगी आदित्यनाथ टीकेला कामातून उत्तर देतात. उत्तर प्रदेशातील बहुतांशी सर्व शहरे द्रुतगती मार्गांनी जोडली जात आहे. पायाभूत सुविधांसाठी तेथे मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. बहुतांश धार्मिक तीर्थक्षेत्रे एकमेकांना वेगवान महामार्गाने जोडण्याचे काम सुरू आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे बांधकामही जवळपास पूर्णत्वास येत चालले आहे. काशी, मथुरा, अयोध्या ही भाविकांसाठीची पर्वणी आहे. तीर्थक्षेत्रे ही नव्या युगातील अर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. योगी आदित्यनाथ यांनी या अर्थक्षेत्रांच्या विकासाकडे म्हणूनच विशेषत्वाने लक्ष दिलेले आहे. उत्तर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विकास, हा देशातील सर्वच राज्यांसाठी आदर्शवत असाच आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121