मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचा काळ खऱ्या अर्थान केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने दिला आहे. ३० जून रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या प्रतिसादाद्वारे त्यांची दाद मिळवतही कमाई केली. मुळात म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचे नाव हे नव्हतेच. या चित्रपटाचे नाव 'मंगळागौर' असे ठेवले होते.
तर केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाचे सुरुवातीला नाव 'मंगळागौर' ठेवण्यात आले होते. मात्र, या नावावरुन चित्रपट कोणत्या तरी देवीचा किंवा धार्मिक कथेवर आधारित आहे की काय असा प्रेक्षकांचा समज होईल म्हणून या चित्रपटाचे नाव बदलण्याचा विचार करण्यात आला. ज्यावेळी चित्रपटासाठी बाई पण भारी देवा हे गाणे गीतकार वलय याने लिहिले त्यावेळी त्यात 'बाईपण भारी देवा' हे वाक्य लिहिले होते. त्यामुळे 'मंगळागौर' जर का नाव ठेवले तर ज्यांना मंगळागौर काय हेच माहीती नाही त्यांच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचणार कसा? या प्रश्न उभा राहिल्यामुळे या चित्रपटाचे सह निर्माते अजित भुरे यांनी 'बाईपण भारी देवा' हे नाव चित्रपटासाठी पक्के केले.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे.