नवी दिल्ली : कनाल कन्नन हे दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध स्टंट मास्टर आहेत.त्यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. कारण असे की, त्यांनी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एक पाद्री एका मुलीसोबत डान्स करताना दिसत होता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी तमिळमध्ये लिहिले की, विदेशी धर्मांची हीच खरी स्थिती आहे. धर्मांतरित हिंदूंनी याचा विचार करून पश्चात्ताप करावा.
या पोस्टमुळे कन्नन यांना १० जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात सत्ताधारी द्रमुकच्या एका नेत्याने तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण नागरकोइल जिल्ह्याशी संबंधित आहे. १८ जून २०२३ रोजी स्टंट मास्टरने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक पाद्री आपल्या वयापेक्षा लहान वय असलेल्या मुलीच्या कमरेभोवती हात घालून नाचताना दिसत आहे.
या ट्विटबाबत कन्याकुमारी येथील रहिवासी ऑस्टिन बेनेट यांनी कन्ननविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ऑस्टिन बेनेट हे डीएमके पक्षाशी संबंधित असून ते आयटी टीमचे सदस्य आहेत. ऑस्टिनच्या तक्रारीवरून नागरकोइल सायबर पोलीस ठाण्यात कानल कन्ननविरुद्ध दोन कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दि. १० जुलै रोजी कन्ननला चौकशीसाठी बोलावले. चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
तामिळनाडू पोलिसांच्या या कारवाईला तामिळनाडूतील हिंदू मुन्नानी या संघटनेने विरोध केला आहे. अटकेच्या निषेधार्थ या संघटनेने पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. तसेच हिंदू मुन्नानी संघटनेचे राज्य प्रवक्ते यांनी हे खोटे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ज्या व्हिडीओमुळे अटक करण्यात आले आहे. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर आधीच व्हायरल झाला होता. त्यामुळे या कृतीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान एलंगोवन यांनी ही तमिळनाडू सरकारच्या हिंदुविरोधी भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, आपल्या विचारसरणीपेक्षा वेगळी विचारसरणी असणाऱ्या प्रत्येकाला तामिळनाडू सरकारकडून त्रास दिला जात आहे. याआधी ही पेरियारविरोधी विधाने केल्याच्या आरोपावरून कन्ननला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. मात्र सप्टेंबर २०२२ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला होता.