धनासाठी नव्हे वनांसाठी धावणारे महत्त्वाचे! : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
04-Jun-2023
Total Views | 62
मुंबई : “आज जगात धनासाठी धावणारे अनेक लोक आहेत. परंतु, आजचे पुरस्कारार्थी वनांसाठी धावणारे आहेत. आपल्याला चलनासाठी ज्या नोटा वनापासून मिळतात त्या वनांचे संवर्धन करता यायला हवे,” असे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यक्रमाचे कौतुक करताना वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. दै. ’मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘सी-टेक’ प्रस्तुत ’स्पिसिज अॅण्ड हॅबिटॅट वॉरियर्स अवॉर्ड्स २०२३’ पुरस्कर वितरण सोहळा रविवार, दि. ४ जून रोजी राणीच्या बागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी मुनगंटीवार यांच्यासोबतच ‘एसएफसी एन्व्हायर्मेंटल टेक्नॉलॉजीज’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
व्यासपीठांवर दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, ‘पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क)चे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन व दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मुख्य व्यवसाय अधिकारी उमेश रॉय चौधरी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘एसएफसी एन्व्हार्नमेंटल टेक्नॉलॉजीज’तर सहप्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ‘मिशन लाईफ’ होते. या कार्यक्रमाचे टेलिव्हीजन पार्टनर ‘झी २४ तास’ आणि ‘रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी ९१.१ एफएम’ होते.स मुनगंटीवार पुढे म्हणाले, “आज अतिशय उत्तम कार्यक्रम दै. ‘मुंबई तरुण भारत’ने आयोजित केला. वनक्षेत्रात कार्य करणार्या अनेकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. आज राजकीय पक्ष रोजगार एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करू शकत नाही, पण आमचे पक्षी रोजगार देऊ शकतात, याचा वनमंत्री म्हणून मला अभिमान वाटतो. ज्यांना वनावर प्रेम आहे त्यांना आपले कार्य निरंतर सुरू ठेवावे लागेल. तरच मानवाला आपण सांभाळू शकतो.” वनविभागाने अनेक योजना हाती घेतल्या, असे सांगून ते पुढे म्हणाले, “आपले पंतप्रधान कांदळवनांना केंद्रस्थानी ठेवून घोषणा करत आहेत.
आज महाराष्ट्रात १०४ चौरस किमी कांदळवन क्षेत्र आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीसुद्धा याबाबत घोषणा केली. आज महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली, म्हणूनच आपण इतरांना वाघ वाटायला सुरुवात करावी लागली. पण, स्वच्छतादूत गिधाड गायब झाले, सारस पक्षी दिसत नाही,” असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, “म्हणूनच जैवविविधता संवर्धन करणे महत्त्वाचे आहे त्यांच्या कामाचे व्हिडिओ व्हायला हवेत. मला आनंद होतो, यावर्षी आपण ‘चला जाणुया वनांना’ योजनेंतर्गत ७५ हजारांपेक्षा जास्त मुले वनात घेऊन जातोय. पुढच्या पिढीसमोर ही महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर असलेले मोठे प्रश्न, जल प्रदूषण, हवा प्रदूषण आणि वायू प्रदूषण या सर्वांवर तोडगा हवा असेल, तर वनांचे संवर्धन करणेच गरजेचे आहे.”
‘एन्व्हायर्मेंटल धनासाठी नव्हे वनांसाठी धावणारे महत्त्वाचे!
टेक्नॉलॉजीज’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर म्हणाले, “जेव्हा आम्ही आमची कंपनी सुरू केली. तेव्हा, मला दै.‘ मुंबई तरुण भारत’, ‘विवेक’ यासारख्या माध्यमांची मदत झाली. हे पाठबळ महत्त्वाचे आहे. मी पुरस्कारांसाठी मदत करत नाही तर एकार्थी परतफेड करतोय. या पुरस्कारांना महत्त्व आहे. कारण, दै. ‘मुंबई तरुण भारत’ अत्यंत अभ्यासपूर्व निवड करून पुरस्कार वितरित करतात.” पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले, आज आपल्या महाराष्ट्राला ८०० किमीचा समुद्रकिनारा तसेच सह्याद्री, सातपुडा लाभला आहे. इथे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळून येते. पिढ्यानपिढ्या आपण जे सण साजरे करतो, ते पर्यावरणपूरक व्हायला पाहिजेत. यावर्षी मुंबई महापालिकेने घरगुती गणपतीबाबत जो निर्णय घेतला तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज गावापासून शहरापर्यंत अनेक तरुण वनरक्षणाचे प्रयत्न करतायत. पंतप्रधान मोदींनी अनेक उपक्रम राबवून पर्यावरणाचा विचार केला. महाराष्ट्र शासन ‘माझी वसुंधरा’ हा उपक्रम तीन वर्षांपासून करतेय ज्याला उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी १६ हजार मियावाकी वने तयार केली. मी ग्वाही देतो, महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग आपल्यासोबत नेहमीच राहील.”
दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी प्रास्ताविकात संस्थेची भूमिका मांडली, कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांची ओळख करून देत ते म्हणाले, “मला आसोलकर यांचे विशेष कौतुक वाटते, आज नवी मुंबईच्या खाडीजवळ आपल्याला अनेक फ्लेमिंगो दिसतात. ते तिथेच का हा प्रश्न साहजिक आहे, त्याचे उत्तर म्हणजे आसोलकर. गेली १८ वर्ष नवी मुंबईचे सांडपाणी प्रक्रिया करून सोडले जाते, ते त्यांच्याच प्रयत्नामुळे. याबद्दल मला नेहमीच त्यांचा अभिमान वाटतो.” कार्यक्रमाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात सगळेच मुंबईपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण आमची टीम तिकडे जाते. या गावागावातील तरुणांना आम्ही पुरस्कार प्रदान करतो.”
‘पार्क’चे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन यांनी पार्कच्या कार्याविषयी सांगितले ते म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी ‘पार्क’ची स्थापना झाली. यात सर्वंकष आर्थिक प्रगती करणे, योजना तयार करणे. मला सांगताना आनंद होतो, आज काश्मीर तसेच पौर्वात्य राज्यात आम्ही काम करतोय. नुकताच ओमकार पाटील हा नवोदित संशोधक आमच्यासोबत रुजू झाला. आता वन्य क्षेत्रातही आमचे कार्य सुरू होतेय. त्याचसोबत कायदेविषयक व अन्य बाबींना घेऊन योजना बनवल्या जातात. ‘वाईल्डलाईफ’ हे माझे क्षेत्र नाही मी किरण यांच्याकडून अजूनही शिकतोय. वनमंत्री सुधीरभाऊ यांच्याकडून आमच्या फार अपेक्षा आहेत. त्यांच्या नेतृत्वात या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य होईल,” असे मला नेहमीच वाटते.
दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “सर्वांसोबत कामे केली, त्यांच्यासोबत जाऊन अनुभव घेतले. पुरस्कारांची निवड करताना अनेक बाबींचा विचार केला. आज मला आनंद होतोय, या क्षेत्रात काम करणारं हे आघाडीच वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्या गोळा करत नाही तर तयार करतो. मजकूर कृतिशील असावा. यानिमित्ताने अधिकृत घोषणेच्या पूर्वीच पहिले किनारी राखीव क्षेत्र घोषित करतोय, ही कल्पना देते. हे भारतातील हे पहिले किनारी राखीव क्षेत्र असेल.
यंदा १३ व्यक्ती व संस्थांना ‘स्पिसिज अॅण्ड हॅबिटॅट वॉरियर्स’ पुरस्कारांनी पुरस्कृत केले. यात ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ डॉ. नंदिनी विनय देशमुख यांना प्रदान करण्यात आला, ‘यंग रिसर्चर अवॉर्ड’ तीन व्यक्तींना, ‘बडिंग नॅचरॅलिस्ट अवॉर्ड’ आणि ‘कन्झर्वेशन कन्ट्रीब्यूटर’ प्रत्येकी दोन तरुणांना दिला आहे. ‘एक्सेप्शनल फॉरेस्ट स्टाफ अवॉर्ड’सुद्धा प्रदान करण्यात आला आहे, तर चार संस्थांना पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारासोबत त्यांच्या कार्यासाठी सहयोग निधी संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. ‘लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारा’चे स्वरुप सन्मानचिन्ह व सहयोगनिधी ६१ हजार रुपये इतका आहे, तर इतर पुरस्कारप्राप्त संस्थांना व व्यक्तींना मानचिन्ह व सहयोगनिधी प्रत्येकी ५१ हजार रुपये प्रदान करण्यात आले.
पुरस्कार प्रदान करताना त्या-त्या संस्थेबद्दल आणि व्यक्तीबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर यांनी माहिती दिली. पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांच्या कार्याबद्दल माहिती देत चित्रफीत दाखवली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे युएन क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये ‘मिशन लाईफ’ची घोषणा केली. याबद्दलची एक छोटी चित्रफीतही पर्यावरणप्रेमींना पाहायला मिळाली. तसेच, मान्यवरांच्या उपस्थितीत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमंग काळे व समृद्धी ढमाले यांनी केले.