मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्यामुळे भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गोटात स्मशानशांतता पसरली आहे. भाजप नेत्यांच्या या आक्रमणाला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न ठाकरे गटाच्या उरल्यासुरल्या पुढार्यांसमोर असल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे घायाळ झालेले ठाकरे सावरत नाहीत तोच आमदार नितेश राणे आणि भाजप नेते मोहित भारतीय यांनी सणसणीत उत्तर देत ठाकरे गटाची बोलतीच बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार नितेश राणे यांनी दि. २५ जून रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत ठाकरे पितापुत्रांवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे. ”काल अवली मुलाच्या बिथरलेल्या बापाने शिवाजी नाट्यमंदिरात एक प्रयोग केला. त्यात उद्धव ठाकरेंनी बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. मात्र, त्यांनी हे लक्षात ठेवावे की देवेंद्र फडणवीस एकटे नसून संपूर्ण भारतीय जनता पक्ष त्यांच्या मागे उभा आहे. त्यामुळे फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी राणेंचा सामना करून दाखवा. आमच्याकडे तुमच्या कुंडल्या असून तुम्ही कुणाच्या घरात कसे घुसता आणि त्या घरांमध्ये भांडणे लावता याची माहिती आम्हाला महाराष्ट्राला द्यावी लागेल,” असा टोला लगावला आहे.
अन्यथा वैभव चेंबर्सचे फुटेज बाहेर काढावे लागेल!
”उद्धव ठाकरे यांनी बोलताना व्हॉट्सअॅप चॅटचा उल्लेख केला. जर तुम्ही इतरांच्या कौटुंबिक प्रकरणामध्ये घुसत असाल, तर मग आम्हालाही ठाकरे कुटुंबातील कोणती व्यक्ती वैभव चेंबर्सच्या चौथ्या मजल्यावर जाऊन व्यवहार करत होती? पाच टक्के भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल! आणि दहा टक्क्यांचा विषय काय आहे? तुम्ही इतरांशी फोनवर बोलून कशाप्रकारे खोके मागवले? याचा सविस्तर खुलासा ‘सीसीटीव्ही’ फुटेज आणि माझ्याकडे असलेल्या १३ फोन कॉल रेकॉर्डिंग्जमधून करावा लागेल,” असा सूचक इशारा नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबीयांना दिला आहे.
...तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही - मोहित भारतीय
‘’तुम्ही देवेंद्र फडणवीसांना दिलेला धोका आणि त्यांची कमी केलेली सुरक्षा राज्याने पाहिलेली आहे. त्यांच्या कुटुंबावर केलेली टीका आणि मुलीवर केलेले आरोप या महाराष्ट्राच्या आजही लक्षात आहेत. तुम्ही पातळी केव्हाच सोडली होती, मात्र त्याची सीमारेषा तुम्ही काल फडणवीसांवर टीका करताना पार केली आहे. त्यामुळे नवाब मलिक असोत किंवा इतर कुणीही मी ज्यांच्यावर आरोप केले ते पुराव्यासह केलेले आहेत. बोरिवली नॅशनल पार्कातील प्रकारासह कलिनामधील हॉटेलात घडलेल्या सगळ्या बाबींचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मला अधिक बोलायला लावू नका, असे खरमरीत प्रत्युत्तर भारतीय यांनी दिले आहे.