नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोने हवाई वाहतूक क्षेत्राच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठा करार केला आहे. इंडिगोने युरोपियन विमान निर्माता कंपनी एअरबसला ५०० विमानं बनवण्याची ऑर्डर दिली आहे. काही दिवसांपुर्वीच टाटा समूहाने एअर इंडियासाठी अमेरिकन कंपनी बोइंगला ४७० विमानांची ऑर्डर दिली होती.
या ऑर्डरमुळे इंडिगोच्या ताफ्यात ए३२० या ५०० विमानांचा समावेश होणार आहे. यामुळे इंडिगोच्या ताफ्यात आता १३३० इतकी एअरबसची विमानं असतील. या विमानांमुळे इंडिगोची ऑपरेटिंग कॉस्ट कमी होणार आहे. कारण ही विमानं इंधनांची बचत करणारी आहेत.
या करारावर बोलतांना इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स म्हणाले की, इंडिगोची ही ऑर्डर ऐतिहासिक आहे. पुढील दशकात इंडिगो कंपनीची ऑर्डर सुमारे १००० विमानांची असेल. यामुळे भारताच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचा इंडिगोचा संकल्प देखील पूर्ण होईल.
सध्या इंडिगो ३०० हून अधिक विमानं चालवते. यापूर्वी त्यांनी एअरबसला ४८० विमानांची ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर अजूनही सुरू आहे. यातचं आता २०३०-२०३५ साठी इंडिगोने ५०० नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे.