नवी दिल्ली : सर्वसामान्य भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वाणिज्य मंत्रालयाने १४ जून रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारतातील घाऊक किंमत निर्देशांक (WPI) -३.४८ टक्क्यांवर घसरला आहे. हा आकडा मागच्या साडेसात वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या वेळी घाऊक किंमत निर्देशांक नोव्हेंबर २०१५ मध्ये -३.६८ टक्के इतका कमी होता.
मे महिन्यात किरकोळ महागाई दर देखील २५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ४.२५ टक्के इतका राहिला आहे. यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळणार आहे.
भारतीय रिझर्व बँकेने एप्रिलच्या सुरुवातीपासून रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामागे भारतीय रिझर्व बँकेचा उद्देश महागाईला नियंत्रित ठेवण्याचा होता. सध्या रेपो रेट ६.५ टक्क्यांवर आहे. यामुळे खुल्या बाजारातील चलनवाढीला आळा बसला होता. याचाच परिणाम महागाई कमी होण्यासाठी झाला आहे.
आता महागाई कमी झाली असल्याने भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कपात करावी अशी मागणी अर्थतज्ञ करत आहेत. भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यास व्याजदर स्वस्त होण्यास मदत होईल. यामुळे बाजारपेठेत पुन्हा एकदा मागणी वाढेल.
या सर्व गोष्टी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेची चलनविषयक धोरण समिती २०२४ च्या सुरुवातीला व्याजदरात कपात करु शकते.