कल्याण : कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा, ठाणकर पाडा परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत.एकीकडे नळाला पाणी येत नाही. आणि दुसरीकडे पाणी आले तरी दुषित पाणी येते यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली कडोंमपाच्या मुख्यालयात धाव घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, बेतूरकर पाडा परिसरातील साईबाबा नगर मधील साईराज सोसायटी, ठाणकर पाडा परिसरातील औंदुबर आळी येथील शिवप्रेरणा मित्र मंडळ या सह इतर परिसरातील नागरिकांच्या घरी पाणी येत नाही. पाणी आले तरी दूषित पाणी पुरवठा होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असल्याने मोहन उगले यांनी तीन दिवसांपूर्वी महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी सुरूवातीला काही त्यांना दालनात जाण्यास मज्जाव केला होता. यावेळी अधिकारी वर्गाने रात्री दहा वाजेपर्यंत पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
यासंदर्भात पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र तरी समस्या सुटत नसल्याने अखेर सोमवारी येथील महिलावर्गासह इतर नागरिकांनी पालिका मुख्यालयात धडक दिली. महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. दरम्यान पाणी समस्या सुटणार नसेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार असल्याचे उगले यांनी सांगितले.