मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट!
25-Jul-2025
Total Views | 12
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून शुक्रवार २५ जुलै रोजी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आली नसली तरी राज्यातील राजकीय वातावरण पाहता या भेटीला विशेष महत्व आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांचा दिल्ली दौऱ्यातील तिसरा दिवस आहे. त्यांनी सकाळपासूनच भाजपच्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे जेष्ठ नेते जे. पी. नड्डा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.
त्यानंतर ते गृहमंत्री अमित शाहांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात जवळपास २५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.