पालघर जिल्ह्यातील अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थना स्थळांवर कारवाई करा आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करा – स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांची मागणी

    10-Sep-2025
Total Views |

पालघर, पालघर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या ख्रिश्चन प्रार्थना स्थळां विरोधात आणि वाढत्या धर्मांतराच्या हालचालीं विरोधात कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी संस्कृती रक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील संस्कृती रक्षणासाठी कार्य करणारे नागरिक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि मिशनरी हालचालींमुळे बाधित गावातील रहिवासी एकत्र आले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या मागण्या सादर केल्या.

निवेदनात १२९ अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थना स्थळांची नावे व स्थान नमूद करून त्यांच्यावर त्वरित बंदी आणावी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मिशनरी माध्यमातून भोळ्या-भाबड्या आदिवासी समाजामध्ये खोटे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणण्याचे प्रकार वाढले असल्याने, राज्यात धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

आदिवासी जिल्ह्यात वाढत्या धर्मांतराच्या हालचालींवर चिंता

पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथे मुख्यतः कष्टकरी शेतकरी, रोजंदारी मजूर यांचे वास्तव्य आहे. येथील पारंपरिक संस्कृती, रितीरिवाज आणि धार्मिक श्रद्धा हे स्थानिक जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक गावांमध्ये बुधवार, गुरुवार, रविवार तसेच इतर दिवशी येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना सभा अनधिकृतपणे घेतल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या सभांमध्ये "आजारी व्यक्ती बरे होतात", "संमोहित करणे", "तेलपाणी लावून पैसा जमा करणे " अशा प्रकारचा भ्रामक प्रचार व अंधश्रद्धा पसरविली जात असल्याचे आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. परिणामी, गावागावात पारंपरिक श्रद्धा व संस्कृती धोक्यात आली असून, गावदेवीचे उत्सव, पारंपरिक विधी, सामाजिक वर्गणी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे समाजामध्ये तणाव आणि वाद निर्माण होत असल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली.

स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आजच्या आंदोलनात उत्स्फूर्त पुणे भाग घेतला.मोहन महाराज शिंगडा,रवींद्र रहाळकर,महावीर सोलंकी,संतोष जनाठे,चंदन सिंग,अनंत कुडू,भारती संखे,रवी शिवदे,प्रभाकर पाटील,मुकलेश गिरी,मुकेश रॉय,अमित संखे, यतीन डोवला,शिरिष संखे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ख्रिश्चन मिशनरी हालचालींनी बाधित गावांतील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक मागण्या :

१२९ अनधिकृत प्रार्थना स्थळांवर तातडीने बंदी व कारवाई.

मिशनरी हालचाली तपासून त्यांचे आर्थिक स्रोत उघड करणे.

राज्य शासनाने ‘धर्मांतर विरोधी कायदा’ लागू करणे.

संस्कृती आणि पारंपरिक श्रद्धा जपण्यासाठी स्थानिक पातळीवर समित्या स्थापन करणे.

संविधानात प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, मात्र त्याचा वापर फसवणूक, अंधश्रद्धा, आणि अनधिकृत मार्गाने केला जात असल्यास त्याविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. पालघर जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती ही शासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे.