संतांचे विचार आणि वारकरी संतपरंपरा हीच महाराष्ट्राची ओळख : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
25-Jul-2025
Total Views | 22
पंढरपूर : संतांचे विचार आणि वारकरी संतपरंपरा हीच महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हेच आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, २४ जुलै रोजी केले.
संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून संत श्री नामदेव महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, उत्तम जानकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सकल संत वंशज तथा संत समाधी संस्थान प्रमुख, विश्वस्त, फडकरी, जेष्ठ कीर्तनकार मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ आहे. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्र बाहेर नेली, रुजवली व वाढवली. त्यामुळे वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा आहे. संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. तसेच हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची स्विकारला आहे. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, "शेतकरी आणि वारकऱ्यांचा विकास हे प्राधान्य असून संत नामदेवांच्या शिकवणीप्रमाणे तळागाळातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. शासन धार्मिक अधिष्ठानास राजकीय अधिष्ठानापेक्षा प्राधान्य देत असून महाराष्ट्रातील तमाम साधू-संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले असून विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिरे, शुद्ध पाणी, निवास, स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत," असेही ते म्हणाले.