प. बंगालमधील न्यू जलपायगुडी ते आसामची राजधानी गुवाहाटीदरम्यान धावणार
29-May-2023
Total Views | 77
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास ५ तास ३० मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी १८२ रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू - मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.
गुवाहाटी- जलपायगुडी वंदे भारत ट्रेन आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक शतकांपासून असलेल्या संबंधांना बळकटी देईल. यामुळे आरामदायी प्रवासात वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतील आणि पर्यटन आणि व्यवसायातून निर्माण होणाऱ्या रोजगारसंधींमध्ये वाढ होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. कामाख्या मातेचे मंदिर, काझीरंगा, मानस नॅशनल पार्क आणि पोबितोरा वन्यजीव अभयारण्य या भागांसोबत या वंदे भारत गाडीमुळे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिलॉन्ग, मेघालयमधील चेरापुंजी आणि अरुणाचल प्रदेशमधील तवांग आणि पासिघाटमधील प्रवास आणि पर्यटनात वाढ होईल याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
ज्या जलदगतीने ईशान्येकडील अनेक दुर्गम भाग रेल्वेने जोडले गेले, त्या वेगाला विकासाच्या गतीचे श्रेय पंतप्रधानांनी दिले. जवळपास १०० वर्षांनंतर नागालँडला दुसरे रेल्वे स्थानक मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले, जिथे एकेकाळी कमी वेगाची क्षमता असलेली नॅरोगेज लाइन उभी होती, त्याच मार्गिकेवरून आता, वंदे भारत सेमी हाय-स्पीड ट्रेन आणि तेजस एक्स्प्रेस धावत आहेत. २०१४ पूर्वी, ईशान्येकडीज रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वेचे सरासरी सुमारे २५०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. यावर्षी हे अंदाजपत्रक १० हजार कोटी रूपयांपेक्षाही अधिक झाले आहे, म्हणजे अंदाजपत्रकामध्ये चारपटींनी वाढ झाली आहे. आता मणिपूर, मिझोराम, नागालँड, मेघालय आणि सिक्कीम ही राजधानीची शहरे देशाच्या इतर भागांशी जोडण्यात येत आहेत. लवकरच ईशान्येकडील सर्व राजधानींची शहरे ब्रॉडगेज नेटवर्कने जोडली जाणार आहेत, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.