मार्गदर्शक ठरणार नवे संसद भवन : उपराष्ट्रपती जगदीप धनखड
28-May-2023
Total Views | 60
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याही संदेशाचे वाचन राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केले. उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास प्रवासाच्या या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल संपूर्ण देशाचे मनःपूर्वक अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे. आपले सध्याचे संसद भवन हे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज जगातील एक मोठी शक्ती म्हणून भारताची ओळख होण्यापर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आहे. आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नवे संसद भवन हे मार्गदर्शक ठरेल, असेही उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.
दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात राष्ट्रार्पित होणारी नव्या संसदेची वास्तू आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाची साक्षीदार आहे. ही वास्तू १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असून विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याची प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संसदेच्या नव्या वास्तूच्या राष्ट्रार्पणप्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्यासह माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ आणि खासदारांच्या उपस्थितीत नव्या संसदेतील लोकसभेच्या सभागृहात शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखविली तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विशेष टपाल तिकीट आणि ७५ रुपयांचे विशेष नाणेही जारी केले.