मुंबई : साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ही उपस्थित होते.त्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांची तक्रार केली. महिलांविरोधात अश्लिल भाषेत टिका केली जात असतांनाही विरोधी पक्षातील नेत्यांनी विधीमंडळात हा विषय काढला नाही. असं म्हणत सुषमा अंधारे भावुक झाल्या. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी टिकास्त्र सोडलं आहे. मिटकरी म्हणाले की, दादा विरूद्ध रडलो तरी मीडियात प्रसिद्धी मिळते. त्यामुळे दादा विरूद्ध बोलायचा नवा ट्रेड आलाय असे म्हणत. दादाहो. रडरागिणी रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते. असं म्हणत मिटकरी यांनी अंधारेंना डिवचलं आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?
"आमचा असाही कोणी आधार नाही. आम्ही मंत्रीपद वैगैरे डोक्यात ठेवून राजकारणात आलेलो नाही. भटक्यांना आधार असावा, आमचे प्रश्न मांडणारं कोणीतरी असावं यासाठी आलो आहोत. सगळे बोलतात माझ्या बोलण्यात रग आहे. याचं कारण माझ्यात धग आहे. पण लोक माझ्या बापापर्यंत जातात, वाटेल ते बोलतात.", असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
"ज्या जमिनीत मी उगवून आले ती कसदार आहे आणि आम्ही दमदारपणे उगवून आलो आहोत." यावेळी सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. हे पत्र वाचून दाखवताना देखील त्यांना अश्रू अनावर झाले. साहेब तुमची महाविकासआघाडीला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच माझं संपूर्ण कुटुंब आज तुमच्यामुळे सुरक्षित आहे असं देखील त्या म्हणाल्या.