एरीक गारसेटी यांनी भारतामध्ये येण्यापूर्वीच जे तारे तोडले आहेत, ते बघता ही व्यक्ती भारतामध्ये केवळ मोदी सरकारविरोधी पक्ष, संघटना, व्यक्ती, एनजीओज् यांच्याशी परस्पर संवादाच्या नावाखाली मोदी सरकारला ‘उपद्रव’ करण्यासाठी येत आहेत की काय, असे वाटते.
गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदासाठी नियुक्ती जाहीर झालेली आहे. या व्यक्तीचे नाव आहे एरीक गारसेटी. कोण आहेत हे एरीक गारसेटी?हा राजदूत अमेरिकेतील लॉस एंजेल्स येथील पूर्व गव्हर्नर म्हणून काम केलेली व्यक्ती असली, तरी या व्यक्तीचा इतिहास वादग्रस्त आहे. या व्यक्तीने भारतात येऊन राजदूतपदाची जबाबदारी घेण्याआधीच त्याचा भारतातील त्याचा अजेंडा काय असेल, हेही त्याने जाहीर केलेले आहे.एरीक गारसेटी हे ५२ वर्षांचे लॉस एंजेल्सचे पूर्व मेयर असून त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत वादग्रस्त आहे. जुलै २०२१ मध्ये हे नाव भारतामधील राजदूताच्या पदासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सुचविले होते. पण चक्क दोन वर्षे लागली, या व्यक्तीची नियुक्ती होण्यासाठी. कारण, या नियुक्तीवर मोहोर उमटवावी लागते सिनेटकडून. सिनेटमध्ये बहुमत येण्यासाठी बायडन यांनी चक्क अडीच वर्षे वाट पाहिली असावी आणि डेमोक्रॅटिक पक्षाला काठावरचे बहुमत सिनेटमध्ये मिळताच, ही नियुक्ती झालेली दिसते आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी २०२३मध्ये एरीक गारसेटी यांचे नाव बायडन यांनी परत एकदा या भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदासाठी सुचविले होते आणि ही नियुक्तीही सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीकडून १३ विरुद्ध ८ या मतांनी झालेली आहे ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे.
एरीक गारसेटी यांच्या नावावर असणारी त्यांची अकडील कारकीर्द बघता त्यांनी लॉस एंजेल्समध्ये चक्क चोर्यामार्या करणारे आणि इतर भुरटे यांना ९०० अमेरिकन डॉलर्स किमतीपर्यंत वस्तू चोरण्यास मुभा दिलेली आहे. ९०० डॉलर्स किमतीपर्यंत कोणतीही गोष्ट चोरी केल्यास तो गुन्हा समजला जात नाही. एरीक गारसेटी यांच्या एका सहकार्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता आणि एरीक गारसेटी यांनी त्या आरोपांकडे दुर्लक्ष केले, असेही सांगितले गेले होते.आता थोडे एरीक गारसेटी या व्यक्तिविशेषाबद्दल. अमेरिकेच्या सिनेटसमोर राजदूतपदाच्या योग्यतेची चाचणी करण्यासाठी एरीक गारसेटी यांची सुनावणी झाली तेव्हा त्यांना सिनेटर्सकडून विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांना या महाशयांनी दिलेली उत्तरे हे बघता एरीक गारसेटी यांचे भारतातील येऊ घातलेल्या कार्यकाळात काय करावयाचे प्रयोजन आहे, हे पुरेसे स्पष्ट होते. काही एक विशिष्ट अजेंडा घेऊन ते भारतामध्ये येत आहेत. गमतीचा भाग असा की, नुकतेच एका कार्यक्रमामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना एरीक गारसेटी हे भारतामध्ये जो अजेंडा घेऊन येत आहेत, त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्या प्रश्नांना उत्तर देताना एस. जयशंकर यांनी एरीक गारसेटी यांना भारतामध्ये आधी येऊ द्या, त्यानंतर आम्ही त्यांना पुरेपूर माहिती देऊ, असे लक्षवेधी विधान केले होते.या एरीक गारसेटी यांनी भारतामध्ये येण्यापूर्वीच जे तारे तोडले आहेत ते बघता ही व्यक्ती भारतामध्ये केवळ मोदी सरकारविरोधी पक्ष, संघटना, व्यक्ती, एनजीओज् यांच्याशी परस्पर संवादाच्या नावाखाली मोदी सरकारला ’उपद्रव’ करण्यासाठी येत आहेत की काय, असे वाटते.
अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या व्यक्तीच्या भारतातील राजदूतपदाच्या नियुक्तीसाठी चक्क दोन वर्षे थांबले होतेआणि या दोन वर्षांमध्ये भारतातील राजदूताची जागा दोन वर्षे भरली गेली नव्हती. ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे. ते बघता या व्यक्तीचे ’उपद्रव’ मूल्य चांगले असावे, याची बायडेन यांना पुरेपूर खात्री असावी असे वाटते.शेजारी देशांमधून भारतामध्ये बेकायदा घुसू पाहणार्या परकीय व्यक्तींना रोखण्यासाठी ‘सीएए’ / ’एनआरसी’ कायदा आणला गेला आहे. या कायद्याबद्दल एरीक गारसेटी यांना सिनेटच्या कमिटीकडून प्रश्न विचारण्यात आलेले होते. या कायद्यामुळे भारतातील ’अल्पसंख्य’ समाज दुखावला जातो आहे, अशी भूमिका अमेरिकेतील सिनेटर मांडत होते आणि एरीक गारसेटी हे त्या भूमिकेला सहमती दर्शवत या कायद्याविरोधात काय करता येईल, हे अमेरिकेच्या सिनेटसमोरील सुनावणीत सांगत होते.परंतु, आता गोष्टी खूप बदललेल्या आहेत. हा पूर्वीचा भारत राहिलेला नाही. भारतही अमेरिकेला तेथील मानवाधिकार, वर्णद्वेष आणि ’ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर ’ वगैरे गोष्टींवर प्रश्न विचारू शकेल.
यापुढील काळात भारतातील तथाकथित दावे आणि पुरोगामी म्हणवून घेणार्या तसेच स्वतःला ’मानवाधिकाराचे’ दूत समजणार्या अनेक लोकांच्या भारतातील अमेरिकेच्या दूतावासातील चकरा यापुढे वाढलेल्या दिसल्या, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. त्यामुळे एरीक गारसेटी यांच्या भारतातील कारकिर्दीतील प्रत्येक हालचालींवर भारतातील जनतेचे बारीक लक्ष असेलच.भारत म्हणजे विविध राज्यांचे मिळून बनलेले संघराज्य आहे, असा उद्घोष भारतातील एका राजकारणी व्यक्तीकडून भारताबाहेरील कार्यक्रमांमध्ये चालू असतोच. ही व्यक्ती आणि २०१४ सालातील युक्रेनमधील विनोदी वाचाळवीर व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात खूपच साम्य आहे. भारतातील या राजकारण्याला भारतातील सामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नाही, हेच त्यांच्या अलीकडील काही वर्षात भारताबाहेर जाऊन भारताची बदनामी करण्याचे जे उद्योग चालू आहेत, त्यावरून दिसून येते. एरीक गारसेटी या व्यक्तीला किती महत्त्व देतात, हेही बघावे लागेल.केनेथ जस्टर हे अमेरिकेचे भारतातील अलीकडील राजदूत होते. त्यांचा भारतातील कार्यकाळ जानेवारी २०२० मध्येच संपुष्टात आला होता. त्यानंतर अमेरिकेच्या भारतातील राजदूताचे हे पद रिकामेच होते.
-सनत्कुमार कोल्हटकर