मुरुड-जंजिरा : तीन दिवसांच्या सलग सुट्टीमुळे तसेच दहावी , बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे आणि मुंबई,ठाणे, पुण्यासारख्या शहरातील वाढलेल्या तापमानामतून थोडासा दिलासा मिळावा या हेतूने मुरुड तालुक्यातील विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून त्यापैकी अनेक पर्यटकांनी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे पासूनच नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.स्थानिक ग्रामस्थ भक्त देखील मोठया प्रमाणांत दिसून आले.
गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरातील साल बदललेले सालकर गुरुजी विनायक पुरुषोत्तम जोशी यांच्या सह सेवा मंडळाचे पुजारी महेश गोविंदराव जोशी यांनी पहाटे श्री सिद्धिविनायकाची पहाटे शोडषोपचारे पुजा अर्चा केली.त्यानंतर भाविकांनी देवदर्शनार्थ मंदिरात गर्दी केली.यात स्थानिकांसह पर्यटकांचाही समावेश होता.
संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिराच्या परिसरात हार, फुले, दुर्वा, नारळ,पेढे ,बर्फी,केळी व उपवासाच्या अन्य पदार्थांच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. सायंकाळी स्थानिक भजनी बुवांनी सुस्वर भजने सादर केली तर सामुहिक आरतीलाही भाविकांची गर्दी झाली होती.