जागतिक जलचर दिन

    02-Apr-2023
Total Views | 128
World Aquatic Day
 
मासे, कासवे आणि विविध प्रकारच्या जलचरांची सागरी जैवविविधतेतील भुमिका, त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख, आजच्या तिसर्‍या जागतिक जलचर दिनाच्या निमित्ताने...


पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. हे जलावरण समुद्र, नद्या, जलाशय अशा निरनिराळ्या स्वरुपात स्थित आहे. त्यात कोट्यावधी जलचर संचार करत असतात. उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात जलावरणातच या प्रक्रिया होत गेल्या आहेत. त्यामुळे थेट जीवाणू, विषाणू पासून ते महाकाय व्हेल पर्यंत अफाट जैवविविधता या ठिकाणी आहे.परंतु, मानवाने स्वतः शिवाय पृथ्वीवरच्या इतर सजीवांची कधीही कदर केली नाही. खरे पाहिले असता उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मानव हा सर्वात शेवटी उत्क्रांत झालेला सस्तन सजीव आहे. परंतु त्याच्या कित्येक अब्ज वर्षांच्या आधीपासून तत्कालीन समुद्रामध्ये पहिला सजीव निर्माण झाला. म्हणजेच पहिला सजीव देखील जलचर होता असे आपल्याला ठामपणे म्हणता येते. त्यानंतर प्रदीर्घ कालावधी नंतर या सजीवांपासून एकपेशीय जीव निर्माण झाले.या बदलाला रासायनिक उत्क्रांती म्हटले जाते. पृथ्वीच्या सुरुवातीच्या अतितप्त वायुस्वरुपात अनेक मूलद्रव्ये एकमेकांशी संयोग करत गेली आणि त्यापासून द्विरेणु बनत गेले. नंतर जटील जैवरासायनिक रेणू निर्माण झाले. आणि कोणे एका क्षणाला जेव्हा या रेणूंच्या समूहाला पेशी आवरणाचे पांघरूण मिळाले तेव्हा पहिला सजीव तयार झाला.


एकपेशीय पेशींपासून कालांतराने बहुपेशीय सजीव बनले. ही सारी उत्क्रांती तत्कालीन सागरात घडली. आजही सागराकडे दृष्टीक्षेप टाकतांना याच इथे या सार्‍या विश्वाच्या पसार्‍यात केवळ एकाच ग्रहावर (अजूनतरी) सजीव आहेत आणि त्यांची उत्पती येथेच सागरात झाली आहे हे आपल्या मनात आले पाहिजे. म्हणूनच जलचरांना अनन्य साधारण महत्व आहे. तरीही मानवजात गाफील आहे आणि आपण या जलचरांना महत्व देत नाही.ज्यावेळी आपण एखादा जलाशय पाहतो, त्यावेळीत्यात असणारे अनेक सजीव आपल्या नजरेस पडत नाही. परंतु या पाण्याच्या पोटात एकपेशीय प्राण्यांपासून ते थेट महाकाय सस्तनी सागरी प्राणी सुखनैव संचार करत असतात.निरनिराळा प्रकारचे रंध्री, आंतरगुही, वलयी, मृदुकाय, कंटकचर्मी अशा प्राणी संघाचे प्रतिनिधी जलाशयात राहत असतात. प्रत्येक जलाशयात तेथील ठराविक परिसंस्था असते.त्या परिसंस्थेचा समतोल राखायचा असेल तर तिथे कार्यरत असणार्‍या अन्नसाखळी आणि अन्नजाळे यांच्या कार्यात मानवाने अडथळे आणू नयेत.परंतु प्रत्यक्षात मानवाच्या विविध क्रियांमुळे, जसे प्रदूषण करणे, पाण्यात विविध कारणांसाठी भराव घालणे,आपले सांडपाणी जलाशयांत सोडून देणे, पाण्यात प्लास्टिक फेकणे, हवामान बदल अशांमुळे या परिसंस्थेतील अन्नसाखळ्या कोलमडतात. पर्यायाने कालांतराने परिसंस्थेचा र्‍हास होत होत जलाशयच मरतो. सागरात किंवा इतर जलाशयात असे होणारे बदल सरतेशेवटी मानवावरच विपरीत परिणाम घडवतात.

विविध अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या बरोबरीनेच पृष्ठवंशीय मत्स्यवर्गातील असंख्य प्रजाती निरनिराळ्या जलावरणात वास्तव्य करून असतात. केवळ पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन त्यांचे जीवन शक्य करतो. तसेच तेथे असणार्‍या वनस्पती आणि प्राणी प्लवकांमुळे त्यांचे अन्नप्राशन होत असते. मत्स्यवर्गापैकी; कुर्चामय कंकाल असणारे शार्क, मोरी, मुशी पाकट इत्यादि कास्थिमत्स्य आणि हाडांचे सांगाडे असलेले अस्थिमस्य या दोन गटातले मासे पाण्यामधील जीवनासाठी उत्कृष्टरित्या अनुकूलित झालेले असतात. पाण्याबाहेर ते जगू शकत नाहीत. आणि मानवाने कितीही यांचे निवासी पाणी खराब केले तरी ते बिलकुलही आवाज न उठवता जगण्याचा संघर्ष करीत असतात.गोड्या पाण्यातले उभयचर, कासवे, मगर, सुसर यासारखे सरीसृप, पाण्यातल्या भक्ष्यांवर अवलंबून असणारे विविध पक्षी ही सारी जलनिष्ठांची मांदियाळीच आहे.विविध मत्स्य प्रजाती मानवाने अन्न म्हणून वापरल्या आहे. अशा प्रजातीमुळे भारतासारख्या विकसनशील देशाला कित्येक अब्जावधी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. याशिवाय अन्न म्हणून मारले जाणारे इतर जलचर जसे कालवे, तिसर्‍या, शिणाणे असे मृदुकाय आणि कोळंब्या, चिंबोर्‍या, शेवंडे यासारखे संधिपाद यांचा इतरही वापर होत असतो, उदा. शंख-शिंपल्यांचा वापर बांधकामात तर नवनव्या जैवक्रियाशील संयुगांचा शोध लावून जलचरांचा वापर औषधनिर्मितीसाठी होतो. मासेमारी हा तर पूर्वापार चालत आलेला व्यवसाय केवळ जलचरांवर अवलंबून आहे.परंतु याचा अर्थ असा नव्हे की सर्वच ठिकाणांहून जलचरांची पीछेहाट होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणाची गरज आता खूप मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होत असल्याने बरीच सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत.आपणही आपल्या परीने प्रयत्न केले तर आपले जलचारांच्या प्रति हवे असणारे मैत्र खचितच वाढेल !


काय आहे जलचर दिनाचे महत्त्व?

सर्वसामान्यांना या प्राण्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यासाठीच असे दिन साजरे केले जातात. जनसामान्यांत जागरूकता आणण्यासाठी माध्यमांच्या शक्तीने आणि पर्यावरणाच्या भक्तीने जागतिक पातळीवर जलचर प्राण्यांविषयी लोकांत संवेदना निर्माण कराव्यात यासाठी हा दिन साजरा केला जात आहे. शिक्षणाच्या माध्यमातून, कायदे करून, धोरणे राबवून, शास्त्रोक्त पद्धतीने परिसंस्था जतन करण्याचा संदेश सर्वांप्रति पोहोचवणे हे आपल्या सारख्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु, त्याही अगोदर आपल्या अंतःकरणात आपल्याच वसुंधरेच्या इतर सहचरांच्या जपणुकीची स्नेहवात प्रज्वलित करणे आवश्यक आहे.

काय आहे यंदाची जागतिक जलचर दिनाची थीम?


अमेरिकेतील ओरेगॉन राज्यामधील पोर्टलंड या शहरात असलेल्या ‘लेविस आणि क्लार्क लॉ स्कूल’ या कायदेविषयक काम करणार्‍या संस्थेमधील ‘अ‍ॅमी विल्सन’ यांनी जागतिक जलचरांच्या रक्षणार्थ काहीतरी ठाशीव योजना करण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला होता. त्यांनीच ‘जलचर कायदा’ (अ‍ॅक्वॅटिक अ‍ॅनिमल लॉ इनिशिएटिव्ह) अमलात आणण्याचा प्रयत्न केला. प्राणीविषयक कायदे करणार्‍या या संस्थेचा हा प्रयास तेथे शिकणार्‍या विद्यार्थांच्या आणि सहकार्‍यांच्या साहाय्याने पूर्ण झाला. त्याचीच पुढची कृती म्हणून २०२० मध्ये प्रथमच ‘३ एप्रिल’ रोजी ‘जागतिक जलचर दिन’ साजरा करण्याचे ठरवण्यात आले. अ‍ॅमी विल्सन यांची मूळ कल्पना असलेला हा जागतिक जलचर दिन, त्यांच्या आणि कॅथी हेस्लर यांच्या प्रयत्नाने साजरा करण्याचा प्रघात पडला. आता दरवर्षी याच दिवशी जगभरातील अभ्यासक आणि सुज्ञ नागरिक एकत्र येऊन याबाबत काही ठोस कृती योजना करत असतात. दरवर्षी या दिनविषयक एक ठराविक विषय सूत्र असते. यावर्षी हा दिन ’जलचरांच्या वापरासाठी वेगळे पर्याय’ (Alternatives to the Use of Aquatic Animals) असे विषय सूत्र आहे.

 
देशातील जलचरांच्या संवर्धनाचे प्रयत्न
  • ‘व्हेल शार्क’ या मत्स्य प्रजातीच्या शिकारीवर बंदी. याचे नाव जरी व्हेल शार्क असले तरी हा मासा आहे. जगातील सर्वात मोठ्या आकाराचा हा कास्थीमत्स्य सस्तनी व्हेल प्रमाणे पिल्लांना जन्म देतो. गुजरातच्या किनार्‍यावर नव्वदीच्या दशकात याची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात होती. ही प्रजाती अस्तंगत होण्याची भीती असतानाच वैज्ञानिक आणि अभ्यासकांनी सामान्य मच्छीमार लोकांना त्याच्याबद्दल माहिती देऊन जागृती केल्यानंतर आता याची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. माहेरपणाला आलेल्या मुलीची काळजी कशी घ्यायची, हे जसं घरातल्यांना माहिती असते तसंच किनार्‍यानजीक प्रजननाला आलेल्या व्हेल शार्कच्या माद्यांना सुखरूप राहू दे, अशा आशयाचे प्रबोधन शास्त्रज्ञांनी केले आणि त्याचा परिणाम आता दिसून येतो.


  • महाराष्ट्राच्या कोकण किनार्‍यांनी तसेच ओडिशाच्या किनार्‍यावर कासव संवर्धनाचे अनेक कार्यक्रम आता घेतले जातात. कासवांची अंडी खाणे, त्यांना मारून खाणे, या बाबी आता जवळजवळ नियंत्रणाखाली आलेल्या आहेत. त्याउलट कासवांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या काळात पर्यटकांना याबाबत माहिती देऊन एक नव्या स्वरूपाच्या कासव जत्रा या पर्यावरण पूरक निसर्ग पर्यटनाच्या योजना ठिकठिकाणी चालू झाल्या आहेत.यातून स्थानिकांना अर्थाजन देखील होते. हे शाश्वत स्वरूपातील बदल आहेत. ‘सॅटेलाईट टॅगिंग’ करून हे जलचर कुठून कुठे जातात, याचाही अंदाज आता शास्त्रज्ञांना येतो.


  • ‘कांदळवन प्रतिष्ठान’ यासारख्या संस्था कांदळवन संवर्धनाचे अनेक प्रकल्प हातात घेत आहे.‘वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेनी देखील महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या परिसंस्थातील अनेक जलचरांकडे लक्ष केंद्रित केले आहे. ‘वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी’ या बंगळुरूस्थित संस्थेने जलचरांकडे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने पावले उचललेली आहेत.


  • सागरी जलचरासोबतच गोड्या पाण्यातील जलचरांचाही अभ्यास चालू आहे. गंगेतील डॉल्फिन, महानदी, चंबळ अशा नद्यांतील जलचर आता शास्त्रज्ञांच्या वात्सल्यपूर्ण नजरेखाली आहेत.


जलचरांच्या स्वास्थ्यासाठी आपण काय करु शकतो?
  • शिक्षण


  • लोकांपर्यत पोहोचणे.


  • जलाशयात काहीही न फेकता त्याऐवजी पुनर्चक्रीकरण, पुनर्वापर, सफाई


  • जल परिसंस्थांसाठी संघटीत होणे


  • जलचर रक्षणार्थ क्रियाशील होणे


  • पैशाची अथवा मनुष्यबळाची मदत पोहोचवणे


  • जलचरांप्रती स्नेहभाव ठेवणे


  • लेखनातून जनजागृती
  • कायद्याचा वापर


  • जलचरांना आपल्या आहारातून काढून टाकणे


-डॉ. नंदिनी देशमुख



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121