नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात बीबीसी)इंडियाविरुद्ध विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
या वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील बीबीसी कार्यालयावर छापा टाकला आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांचीही तपासणी केली होती. या प्रकरणी अधिकृत निवेदन देताना, आयकर विभागाने म्हटले होते की ते एफडीआय उल्लंघनाच्या प्रकरणात बीबीसीची चौकशी करतील. त्यासाठी बीबीसीवर परकीय चलन उल्लंघन कायद्यांतर्गत (फेमा फंडिंग अनियमितता) गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, बीबीसीतर्फे काही दिवसांपूर्वी एक भारतविरोधी माहितीपट प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे या माहितीपटामध्ये खोट्या माहितीचा आधार घेऊन आरोप करण्यात आले होते. या माहितीपटाविषयी भारताने तीव्र आक्षेप नोंदवून ब्रिटनला इशाराही दिला होता. त्याचप्रमाणे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील या माहितीपटाविषयी हात झकटले होते.