मुंबई : ''हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कार्य, त्यांनी हिंदुत्व आणि बाबरी मशीद प्रकरणात दिलेले योगदान यासाठी आम्ही कायमच बाळासाहेबांचा आदर करत आलेलो आहोत आणि करत राहू. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुठल्याही नेत्याने काय करावे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर ठाकरेंनी बोलू नये. चंद्रकांत दादांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करून उद्धव ठाकरे राजकारण करत असून केवळ इतरांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत धन्यता मानत आहेत.
इतकी वर्षे बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करण्यात उद्धव ठाकरेंनी धन्यता मानली. बाबरी प्रकरणात बाळासाहेबांच्या भूमिकेचे देशाने स्वागत केलेले आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते हे त्यांनी सांगावे. वडिलांच्या जीवावर जगण्याची एक वेळ असते, त्यामुळे उद्धव ठाकरे अजून किती दिवस बाळासाहेबांच्या जीवावर राजकरण करून जगणार ?'' असा खोचक सवाल भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
ठाकरे नाव टिकवण्यासाठीच शिंदेंचे प्रयत्न
''ठाकरेंचे नाव पुसण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत असा आरोप ठाकरे गट कायम करत आला आहे. मात्र, कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या आपल्या कडवट राजकीय शत्रूंशी सत्तेसाठी युती करून हिंदुत्वाचा विचार बासनात गुंडाळून बाळासाहेबांचे विचार आणि ठाकरेंचे नाव बुडवण्याचे काम तुम्हीच करत होतात. मात्र एकनाथ शिंदे यांनी हा उठाव करून ठाकरे हे नाव आणि हिंदुत्वाचा विचार कायम ठेवण्यासाठी शिंदे हेच प्रयत्न करत आहेत,'' या शब्दांत त्यांनी ठाकरेंना सुनावले आहे.
तुमच्या कोट्यांचा राज्याला उबग आलाय !
ठाकरेंकडून भाजपवर केल्या जाणार्या टीकेवर दरेकर म्हणाले की, ''भाजप ही भरकटलेली जनता पार्टी आहे किंवा भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे अशा प्रकारच्या या कोट्यांचा जनतेला उबग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आलेय त्यावर उद्धव ठाकरे यांनी विचार करावा.पक्ष रसातळाला गेला, चिन्ह गेले, नाव गेले. बाळासाहेबांचे विचारही एकनाथ शिंदे सोबत घेऊन गेले. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसाही सांभाळू शकले नाहीत. ठाकरे नाव टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा पवित्रा घेतला आहे. हिंदुत्वाचे विचार बासनात गुंडाळून तुम्ही राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेलात. त्यामुळेच उद्धव ठाकरेच ठाकरे नाव मिटवत होते, असा टोलाही आ. दरेकर यांनी लगावला.
''उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे. आमच्या पक्षात काय करायचे हे आमचे नेतृत्व व पक्षश्रेष्टी समजून घेण्यात सक्षम आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,'' असेही दरेकर म्हणाले.