नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष’ असा दर्जा काढून घेतला आहे. त्यासोबतच तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचाही ‘राष्ट्रीय पक्ष’ असा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. पक्षाची विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरी, निवडून आलेले सदस्य आणि मतांची टक्केवारी यांचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष’ असा दर्जा काढून घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे.
कायद्यानुसार, कोणत्याही पक्षास ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून दर्जा हवा असल्यास त्यास तीन निकषांची पूर्तता करावी लागते. पहिला निकष म्हणजे कमीत कमी चार राज्यांमध्ये किमान ६ टक्के मते प्राप्त व्हावीत, दुसरा निकष म्हणजे लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान २ टक्के जागा किमान तीन राज्यांतून आलेल्या असाव्यात आणि तिसरा निकष म्हणजे पक्षाला चार राज्यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळायला हवा. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हे निकष पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याने त्यांचा ‘राष्ट्रीय पक्ष’ असा दर्जा रद्द करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचाही ‘राष्ट्रीय पक्ष’ हा दर्जा रद्द केला आहे.
आम आदमी पक्ष झाला ‘राष्ट्रीय’
निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (आप) ‘राष्ट्रीय पक्ष’ दर्जा दिला आहे. त्यासाठी आम आदमी पक्षाला गुजरात किंवा हिमाचलमध्ये ६ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे आवश्यक होते. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला १३ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे आयोगाने ‘राष्ट्रीय पक्ष’ दर्जा बहाल केला आहे.