सौंदर्यजतन, सौंदर्यवर्धन- आयुर्वेदासंगे भाग ४

    20-Mar-2023
Total Views | 146
Beauty Care


मनुष्य शरीर हे त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यांनी बनलेले आहे. मागील लेखात वात-पित्त आणि कफाचा प्राकृतिक व वैकृतिक परिणाम त्वचेवर कसा होतो, याबद्दल वाचले. आजच्या लेखात प्रकृतिनुरुप नैसर्गिक त्वचा कशी असते, याबद्दल जाणून घेऊयात.


प्रकृती म्हणजे व्यक्तीची ओळख, त्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक इ. ची जडणघडण, ‘इंडिव्ह्युज्युअल आयडेंडिटी’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही प्रकृती गर्भधारणेच्या वेळीस ठरते आणि आयुष्यभर हीच प्रकृती राहते. प्रकृती ठरण्यासाठी पितृबीज, मातृबीज, मातेचा गर्भसंभव काळी असलेला आहारविहार, बाहेरील ऋतू इ.वर अवलंबून असते. प्रकृती म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा स्वभावधर्म, शरीराच्या विविध क्रिया, अवयव, जीवनव्यापार सतत चालू असतात, क्रियाशील असतात. पण, प्रकृतिभेदाने यात थोडाफार फरक असतो.

आयुर्वेदानुसार सात प्रकारच्या प्रकृती असतात. वातप्रकृती, पित्तप्रकृती, कफप्रकृती, वातपित्तात्मक, वातकफात्मक, कफपित्तात्मक. या तीन एकत्रित प्रकृतींना ‘द्वंद्वज् प्रकृती’ म्हणतात. म्हणजे दोन-दोन दोषांचा एकत्रित परिणाम या प्रकृतींमध्ये दिसतो आणि सातवी प्रकृती म्हणजे ‘त्रिदोषात्मक’ यालाच ‘समधातुप्रकृती’ असेही म्हणतात.प्रकृतिभेदाने त्वचेमध्ये थोडी भिन्नता दिसून येते. त्वचेची संरचना, कार्य सर्व सारखी असतात, पण कार्य घडण्यामध्ये जी निपुणता सकसता असते, त्यात भिन्नता आढळते. (प्रकृती समजून घेताना प्रत्येक वैद्य काही शारीरिक परीक्षणे, काही संस्थांचे (जसे पचनसंस्था) काही कार्ये जशी प्राकृतिक निद्रा (रोजची झोप) मलनिष्क्रमण पद्घत, स्वभाव, आकलनशक्ती, स्मृती इ. विविध गोष्टींबद्दल विस्ताराने जाणून घेतो आणि त्या अतिप्रकृति काय आहे, त्याचे निदान करतो. आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने व व्याधी झाल्यास, तो बरा करण्याच्या दृष्टीने, प्रत्येक वैद्याला प्रकृतिपरीक्षण करणे महत्त्वाचे असते. आज विशिष्ट प्रकृतीमध्ये त्वचा कशी असते (नैसर्गिक त्वचा) याबद्दल जाणून घेऊया.

वातप्रकृती


वाताचे काही स्वाभाविक गुण आहेत- असे रूक्षता, हलकेपणा, थंडावा, शुष्कता, खरखरीतपणा इ. या प्राकृतिक गुणांचा परिणाम त्वचेवरही होतो.वातप्रकृतीची व्यक्तीसहसा पुष्ट (वेल बिल्ट) नसते. तशीच लहान शरीराची असते. कृश असते. शरीराची हालचाल झटपट होत असते. ओठ, भुवया, हात-पाय इ. अवयव प्रमाणबद्घ नसतात. त्वचा पातळ असते आणि अंगावर शिरा पसरलेल्या दिसतात. वातप्रकृतीच्या व्यक्तींना थंडी सहन होत नाही. चटकन अंगावर काटे येतात. अंग थंड पडते. कापरे भरते. वाताच्या खरखरीत गुणामुळे केस, नखे, हात-पाय व एकंदरीत सर्वांगावरील त्वचा खरखरीत असते. पायाला भेगा पडणे, ओठ चिरणे इ. वातप्रकृतीच्या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने होताना दिसते. त्वचा पातळ आणि ताणल्यासारखी दिसते.


उन्हाळ्यात अतिऊन सहन होत नाही आणि थंडीत थंडी सोसत नाही. थंडीमध्ये त्वचा फाटणे, खरखरीतहोणे अधिक होते. त्वचेचा रंग थोडा असमान असतो. त्यांचा चेहर्‍यावर जेव्हा ‘पीम्पल्स’ (तारुण्यापीटिका) येतात, तेव्हा त्या छोट्या-छोट्या असतात. पूरळ आल्यासारखे दिसते. थंडीत वातप्रकृतीच्या व्यक्तीची त्वचा खूप कोरडी होते. वारंवार ‘कोल्ड क्रिम’ आणि ‘मॉशरायझर’ लावावे लागते. साबण लावल्यास त्वचा खूप कोरडी होऊन ताणल्यासारखी जाणवते. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर ही त्वचा थोडी कोरडी होते. वातप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये त्वचा काळवंडणे, कोरडी पडणे, भेगाळणे/चिरणे अशा तक्रारी जास्त आढळतात.
 
पित्तप्रकृती
 
पित्ताचे स्वाभाविक गुण बघता ते उष्ण, तीक्ष्ण (तीव्रता असलेेले) द्रव गुणी असते. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती उन्हातून जाऊन आल्यावर लालबूंद होतात. कानशिले लालबूंद होतात. त्यांना घामही खूप येतो. बरेचदा घामाला दुर्गंध असतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींच्या कपड्यांवर घामाचे पिवळे डाग राहतात. यांचे डोळे लहान व पिंगट रंगाचे असतात. अंगावरील लव छोटी आणि पिंगट/भुरकट रंगाची असते. पापणीचे केस विरळ, आखूड असतात. पित्ताचा स्वाभाविक गुण उष्ण असल्यामुळे या प्रकृतीच्या व्यक्तींना उन्हाळा/गरमी सहन होत नाही. यांचे तळहात, तळपाय आणि चेहरा उन्हातून जाऊन आल्यावर लालबूंद होतो. अंगाची आणि तळव्यांची लाही लाही होते.


पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये स्वाभाविकत: लवकर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. म्हणजे लवकर केस गळणे, केस पिकणे व चेहर्‍यावर सुरकत्या निर्माण होणे. यांची त्वचा गौर असते, पण त्यावर तीळ खूप अधिक असतात. यांची त्वचा थंडीतही कोरडी पडत नाही. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना थंडावा, पावसाळा आवडतो आणि सहन होतो. तारुण्यपीटिका या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात होतात. त्यात पू होणे, चिघळणे, आरक्तता असणे आणि अशा पुटकुळ्या वारंवार होणे, असे होत राहते. जसे पापणीचे केस आखूड आणि पिंगे असतात, तसेच डोक्यावरचे केस आणि अंगावरील लवही आखूड आणि पिंगट असतात.

कफप्रकृती

 
प्रकती अनुरुप त्वचेचा रंग भिन्न-भिन्न असतो. वातप्रकृतीची माणसे काळी-सावळी असतात. पित्तप्रकृतीची माणसं गोरी/निमगोरी, घारी असतात. कफप्रकृतीच्या व्यक्ती गोर्‍या असतात. यांचे शरीर बांधेसूद, धष्टपुष्ट, गोंडस आणि सुदृढ असते. कफप्रकृतीच्या व्यक्तींचे अवयव स्वाभाविकत: अधिक पुष्ट असतात. त्वचा व्यवस्थित आर्द्र असते, पोषित (नरिश्ड) असते. त्वचा तुकतुकीत आणि सदृढ असते. त्वचेचा पोत उत्तम असतो. त्वचा स्निग्ध, श्लष्ण, मृदू असते. बाह्य वातावरणाला सामोरे जाण्यास या प्रकृतीची त्वचा सर्वात अधिक सक्षम असते. ही त्वचा लवकर सुरकूतत नाही किंवा कोरडीही पडत नाही. ‘आयडीयल’ त्वचा जशी असावी तशी कफप्रकृतीची त्वचा असते. त्वचा प्रकृतित: उत्तम असल्यामुळे त्यांच्या फार तक्रारी नसतात.

द्वंद्वज् प्रकृतीचा विचार करताना दोन-दोन दोषांचे गुण त्या प्रकृतिमध्ये एकत्र दिसतात. याचा अर्थ प्रकृतीप्रमाणे नैसर्गिकरित्या उत्पन्न त्वचा ही दिसण्यात आणि कार्यक्षमतेमध्ये भिन्न-भिन्न असते. त्यानुसार त्यात होणारे त्रास, तक्रारी, आजारही वेगवेगळे असतात किंवा एकच त्रास असला, तरी त्याची प्रखरता आणि जीर्णता यात बद्दल आढळतो. उदा.उष्णजन्य होणारे त्रास पितप्रकृतीच्या व्यक्तीमध्ये अतितीव्र व तत्काळ होताना दिसतात. त्यात उन्हाळ्याचीप्रखरता असली, तर ती लक्षणे अधिक बळावतात.साम्यावस्थेतील त्वचा म्हणजे त्रिदोषात्मक किंवा समधातुप्रकृतीची त्वचा होय. यात तीनही दोष समत्व भावाने असल्याने समतोल (बॅलन्स) राखण्यास मदत होते.प्रकृतीनुसार त्वचापरीक्षण केल्याने ते विकार होऊ नयेत, यासाठीदेखील उपाययोजन करणे सोपे होते. (क्रमश:)
 


 
-वैद्य कीर्ती देव
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व
पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)






 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121