‘लव्ह जिहाद’ म्हणजे भारतीय समाज आणि संस्कृतीला प्रताडित करण्याचे षड्यंत्र : साक्षी गायकवाड
25-Feb-2023
Total Views | 123
22
नवी मुंबई : ‘श्री श्री शंकर देव सेवा समिती’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून महापे येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या प्रमुख वक्ता समाजसेविका साक्षी गायकवाड म्हणाल्या की, “ ‘लव्ह जिहाद’ म्हणजे भारतीय समाज आणि संस्कृतीला प्रताडित करण्याचे षड्यंत्र आहे.” यावेळी ‘लव्ह जिहादमुक्त नवी मुंबई’ या विषयी प्रास्ताविक गायत्री गोहाँई यांनी केले. नवी मुंबईमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणाम त्यांनी मांडले. तसेच, रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे ‘सकल हिंदू समाजा’तर्फे ‘लव्ह जिहाद‘, ’लॅण्ड जिहाद’ विरोधी जनआक्रोश मोर्चाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये महापेच्या नागरिकांनी, महिलांनी सहभागी होऊन ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ विरोधात आक्रोश व्यक्त करावा, असे आवाहन गायत्री यांनी केले.
त्यानंतर ‘लव्ह जिहाद’ आणि त्याचे स्वरूप, परिणाम याबाबत समाजसेविका साक्षी गायकवाड यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. “महाराष्ट्रमध्ये ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणारा कायदा आवश्यक असून ती काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. “हिंदू धर्म हा जगातील सहिष्णू आणि मानवतावादी धर्म असून आपल्या धर्मात महिलांना सन्मानाने सुरक्षित जीवन जगता येते. फसवून, घाबरून धर्मांतर केलेल्या मुलींच्या आयुष्याचा नरकच होतो,” असे सांगत, विवाहाचे, प्रेमाचे आमिष देऊन धर्मांतरित झालेल्या मुलींच्या जीवनात काय घडते, याबद्दल साक्षी यांनी सविस्तर माहिती दिली. “या सगळ्यांना आळा घालायचा असेल, तर महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणारा कायदा व्हायला हवा,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित नागरिक आणि स्त्रीशक्तीने संवाद साधताना ठामपणे मागणी केली की, महाराष्ट्रात तत्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा पारित व्हावा. स्थानिक नगरसेवक चंद्रकांत पाटील, गावदेवी महिला बचतगटाच्या अध्यक्ष गंगाताई पाटील यांनी ही सभा आयोजित केली होती. सभेला महापे येथील स्थानिक नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.