नाशिक : शहर काँग्रेसला तब्बल आठ वर्षांनंतर प्रभारी का होईना, शहराध्यक्ष मिळाले. प्रभारी शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच शहरात पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षांतर्गत छाजेड यांच्या विरोधातील गट पुन्हा सक्रिय झाला असून, त्यांच्याकडून शहरात ‘समांतर काँग्रेस’ सुरू झाली आहे. समांतर काँग्रेसने शिवजयंती पाठोपाठ संत गाडगे बाबा महाराज जयंतीदेखील वेगळी साजरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी प्रभारी शहराध्यक्षपदाची धुरा गेल्या आठ वर्षांपासून सांभाळली. पक्षांतर्गत ‘एक व्यक्ती एक पद’ यानुसार शरद आहेर यांनी जून २०२२ मध्ये शिर्डी येथे पक्षाच्या झालेल्या चिंतन बैठकीत राजीनामा दिला. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक गुरमित बग्गा यांचा पक्षप्रवेश होऊन त्यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागणे निश्चित झाले होते. तसे पत्रदेखील प्रदेश काँग्रेसकडे तयार होते. मात्र, यास पक्षांतर्गत गटबाजी आडवी आल्याने ही नियुक्ती रखडली. त्यानंतर पूर्णवेळ शहराध्यक्ष पद मिळेल, असे वाटत असतानाच माजी शहराध्यक्ष अॅड. छाजेड यांच्यावर शहराध्यक्षपदाची धुरा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टाकली.
छाजेड यांची प्रभारी शहराध्यक्षपदी झालेली नियुक्ती काँग्रेसतंर्गत तीव्र विरोध झाला. त्यामुळे छाजेड यांच्या पदग्रहण सोहळयाकडे माजी शहराध्यक्षांसह बहुतांश प्रमुख पदाधिकार्यांनी पाठ फिरवत गटबाजीचे दर्शन घडविले. सोहळ्यास माजी शहराध्यक्ष शरद आहेर उपस्थित नव्हते.
प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे, वत्सला खैरे आदींची उपस्थिती असली तरी काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, सुरेश मारू, राजेंद्र बागूल यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष यांची अनुपस्थित खटकली. हा विरोध असतानाच अशीच गटबाजी शिवजयंती कार्यक्रमातही दिसून आली. शहर काँग्रेस कमिटीमध्ये दोन गटांतर्फे शिवजयंती साजरी करत छाजेड विरोधी गटाने आपला विरोध दाखवत समांतर काँग्रेस पुन्हा सक्रिय झाल्याचे दाखवून दिले.
राष्ट्रीय अध्यक्षांकडे करणार तक्रार
माजी शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या कन्येचा विवाह आहे. त्यामुळे छाजेड विरोधी गटाची बैठक होऊ शकलेली नाही. परंतु, विवाह झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत ही बैठक होणार असून यात छाजेड यांना हटविण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्य प्रभारी एच. के. पाटील यांना भेटण्याची रणनीती आखली जाणार असल्याचे समजते.