आठ दिवसांत माफी न मागितल्यास सुषमा अंधारेंवर हक्कभंग – नीलम गोऱ्हे
20-Dec-2023
Total Views |
नागपूर : आमदार रवींद्र धंगेकर यांना उपसभाती सभागृहात बोलू देत नाही, अशा आशयाचा ‘व्हिडिओ’ उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. धंगेकर हे विधान परिषदेचे सदस्य नसल्याने त्यांना बोलू न देण्याचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणावा, असा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी सभागृहात ठेवला. यावर सभागृहात चर्चा झाल्यावर सुषमा अंधारे यांनी ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी; अन्यथा त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव ठेवण्यास अनुमती देण्यात येईल, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिले.
या संदर्भात गोर्हे म्हणाल्या, ‘धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसताना ‘मी कसे बोलू दिले नाही’, याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते; पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात त्यांना साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये, हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी लेखी दिलगिरी व्यक्त करायला हवी, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात चर्चा करतांना मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी अशा प्रकरणांची वारंवारता टाळण्यासाठी या संदर्भात समिती नेमून आचासंहिता बनवण्याची मागणी केली.
माध्यमांनी वृत्त दाखवण्यापूर्वी खात्री करावी
जेव्हा कुठल्याही आमदारांच्या संदर्भात वृत्त येते, तेव्हा प्रसिद्धीमाध्यमांनी त्यावर त्यांचे मतही घेतले पाहिजे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा एखादा ‘व्हिडिओ’ दूरचित्रवाहिन्यांना मिळाला, तर ते लगेच प्रसारित करण्याची घाई न करता त्यांनी तो ‘फॉरेन्सिक लॅब’कडून पडताळून घेतला पाहिजे. अशी पडताळणी ४८ तासांमध्ये होते; मात्र ती होईपर्यंत वाहिन्यांनी तो प्रसारित करता कामा नये. गतवेळी असाच प्रकार झाल्यावर दोन वाहिन्यांनी माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती, असे गोऱ्हे यांनी सांगितले.