मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील (एसआरए) बाधितांसाठी कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांतील घरे देण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनात दिली. एमएमआरडीए, महानगरपालिका आदी यंत्रणांच्या विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांसाठी (पीएपी) सदनिकांची आवश्यकता असते त्यातच एसआरएला सुध्दा संक्रमण शिबिरांची आवश्यकता असल्याने यामधील सदनिका प्रकल्पबाधित शिबिरामध्ये रुपांतरित करून देण्याबाबत लवकरच बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
मंत्री सावे म्हणाले, मुंबईत पाच हजार ४४१ कायमस्वरुपी संक्रमण शिबिरे उपलब्ध असून त्यापैकी २८८ सध्या उपलब्ध आहेत. या अनुषंगाने संक्रमण शिबिरांची संख्या वाढविण्यात येईल. त्याचबरोबर एसआरएच्या प्रकल्पांची गती वाढविण्यात येईल. ज्या ठिकाणी शिबिरांची मागणी नसेल त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
एसआरएच्या सदनिका विकण्याची मुदत मर्यादा ५ वर्षाची करणार
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास दहा वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.