डोंबिवली : तामिळनाडूत वैमानिकांना प्रशिक्षण देणारी पहिली व एकमेव संस्था उभारणारा कॅ. सचिन भाने आणि १२ लाख विद्यार्थ्यांमधून ४१ वा क्रमांक पटकावून सैन्यात अधिकारी होण्यासाठी `एनडीए'मध्ये दाखल झालेला श्रेयस शंकर भोईर, हे यंदाच्या आगरी महोत्सवातील खास आकर्षण ठरले आहेत . आगरी समाजाच्या सामान्य कुटुंबातील या दोघा तरुणांनी घेतलेली झेप तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
डोंबिवलीतील १९ व्या आगरी महोत्सवात `घेई उंच भरारी' उपक्रमांतर्गत तामिळनाडूतील सलेम येथील `एक्विएअर'चे संस्थापक कॅप्टन सचिन भाने यांची व एनडीएमध्ये प्रवेश मिळविलेला तरुण श्रेयस शंकर भोईर यांची प्रकट मुलाखत अभिनेते व संवादक सतिश नायकोडी यांनी घेतली. त्यावेळी या दोघा तरुणांनी करियरमधील आपल्या यशस्वी वाटचालीचा प्रवास उलगडून सांगितला. `आगरी युथ फोरम'तर्फे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दोघांचाही सत्कार केला.
आगरी समाजातील तरुणांनी जिद्द व मेहनत करण्याची तयारी ठेवण्याबरोबरच लक्ष्य साध्य करण्याचे ध्येय ठेवून कार्य केल्यास काहीही अशक्य नाही. तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल. पण त्यासाठी स्वत:ला तरुणांनी कॅपेबल बनवावे. आम्ही सामान्य कुटुंबातील आहोत. आमच्या कुटुंबियांनी दिलेला पाठिंबा आम्हाला लाखमोलाचा होता. पारंपरिक क्षेत्रांपेक्षा नव्या वाटा निवडल्यानंतर मिळालेल्या यशामध्ये कुटुंबियांचे योगदान मोठे आहे, अशी भावना कॅ. सचिन भाने व श्रेयस भोईर यांनी व्यक्त केली.
लहानपणी लाईट गेल्यावर अंगणात बसून आकाशातील विमान पाहून पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कॅ. सचिन भाने यांच्या मालकीची आता तीन छोटी विमाने आहेत. त्यांनी जिद्दीने पायलट होण्याबरोबरच आणखी २०० मुलांना यशस्वीपणे पायलटचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या कंपनीत प्रामुख्याने मराठी तरुण कार्यरत आहे.
श्रेयसने आठवीत असल्यापासून वेगळ्या क्षेत्रातील करियरचे स्वप्न पाहिले. बॉलिवूडमधील काही देशभक्तिपर चित्रपटांमुळे त्याला सैन्यात भरती होण्याची कल्पना सुचली. श्रेयस हा २२ जणांच्या संयुक्त कुटुंबात राहतो. त्याने सैनिक होणार असल्याचे सांगितल्यावर आई-वडिलांसह कुटुंबियांनी दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला. त्याने `एनडीए'ची परीक्षा हेच टार्गेट ठेवले होते. `मागे हटणार, तो आगरी कसला' असे मनात म्हणत तो स्वत:ला चॅलेंज करीत असे. त्यातून या परीक्षेसाठी त्याने अथक मेहनत घेतली. सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या ४०० मध्ये क्रमांक आणण्याचे ध्येय ठेवले. लेखी परीक्षा, मुलाखत, बुद्धीमत्ता व मानसिक चाचणी, मैदानी चाचणी अशा प्रत्येक टप्प्यात तो यशस्वी झाला. प्रत्येक पायरीवर त्याने आत्मपरीक्षण करून कामगिरी सुधारत नेली. त्यामुळे त्याला ४१ वा क्रमांक मिळविण्यात यश आले. आता भरतीनंतर प्रशिक्षणामध्ये कसोटीसाठी तयार झालो आहे. प्रत्येक क्षण हा महत्वपूर्ण असून, तो जिंकण्यासाठी माझा निश्चय असतो, अस श्रेयसने सांगितले. आगरी महोत्सवाच्या व्यासपीठावर आमंत्रित केल्याबद्दल कॅ. सचिन भाने व श्रेयस भोईर यांनी आभार मानले.
महिलांचा सर्वांगसुंदर हरिपाठ
वारकऱ्यांचा नित्यपाठ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ. आगरी महोत्सवाच्या मंचावर समाजातील महिलांनी सर्वांग सुंदर असा हरिपाठाचा कार्यक्रम सादर केला. या हरिपाठाच्या नामघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात आगरी महोत्सवात श्री संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे वातावरण मंगलमय होऊन गेले होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मृदंग वादक किशोर भंडारी यांच्या शिष्य परिवारामधील ४० जणांनी पखवाजची उत्तम साथ केली. पखवाजच्या तालावर या महिलांनी सुंदर पावली खेळून माऊलींच्या चरणी हरिपाठ सेवा सादर केली. या हरिपाठामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये पाच तालुक्यातील २० गावांतील २० हरिपाठ मंडळातील ४० माता-भगिनी सहभागी झालेल्या होत्या.