नागपूर - व्हॉट्सअप, टेलिग्राम आदी ‘ॲप’द्वारे जुगार खेळला जातो तेव्हा ‘ॲप’मध्ये शिरून कारवाईस मर्यादा येते. याविषयीच्या तक्रारी केंद्रशासनाकडेही प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा’ उपलब्ध झाल्यास अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणता येईल. त्यामुळे सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा शेअरींग’साठी केंद्रशासन कायदा करण्याच्या विचारात आहे. लवकरच याविषयीचा कायदा येईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
एका लक्षवेधी सूचनेवर आमदार बच्चू कडू यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’वर बंदी घालण्याची मागणी सभागृहात केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ऑनलाईन गेमिंगसाठी दक्षिण अमेरिकेत रजिस्ट्रेशन केले जाते आणि दुबई येथून ही यंत्रणा चालवली जाते. त्यामुळे ‘ऑनलाईन गेमिंग’वर बंदी घालण्यासाठी केंद्रशासनाला कायदा करावा लागेल. जो जुगार आपण प्रत्यक्ष बंद केला, तो ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू आहे. ‘इन्स्टाग्राम’ सारख्या सामाजिक माध्यमांवर जुगार खेळण्यासाठी संदेश पाठवला जातो. हा संदेश पाठवण्याची विशिष्ट पद्धती आहेत. त्याद्वारे ‘गुगल पे’वर पैसे घेतले जातात. त्यानंतर ‘कुरिअर’द्वारे पार्सल दिले जाते. अशा नवनवीन पद्धतींचा उपयोग केला जातो. ‘ऑनलाईन गेमिंग’विषयी केंद्रशासनाने कायदा केला नाही, तर महाराष्ट्र यासाठी स्वतंत्र कायदा करेल; परंतु केंद्रशासनाचा कायदा येईपर्यंत आपण वाट पाहू.’’
सायबर गुन्ह्यांविरोधात विशेष यंत्रणा
ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यावर पैसे ५-६ अधिकोषांमध्ये फिरून विदेशात पाठवले जातात. त्यामुळे हा पैसा पुन्हा मिळवता येत नाही. हळूहळू प्रत्यक्ष होणारे आर्थिक गुन्हे अल्प होऊन घरी राहून ऑनलाईन गुन्हे वाढत आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यात शीघ्रगतीने कारवाई करणारी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. यामध्ये जगातील १७ प्रथितयश आस्थापना सहभागी होत आहेत. यामध्ये सर्व प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. यामध्ये बँक, सामाजिक प्रसारमाध्यमे यांचे प्रतिनिधीही सहभागी असतील. एप्रिल-मेपर्यंत ही यंत्रणा तयार होईल. ही यंत्रणा सायबर गुन्ह्यांशी लढा देईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
सेलिब्रिटिंनी ‘ऑनलाईन गेमिंग’ची जाहिरात करणे चुकीचे
केवळ पैसे मिळतात म्हणून प्रसिद्ध व्यक्तींनी (सेलिब्रिटी) ‘ऑनलाईन गेमिंग’च्या जाहिराती करू नयेत. यांमुळे जुगाराची सवय लागते. प्रसिद्ध व्यक्तींनी अशा प्रकारची विज्ञापने करू नयेत, यासाठी मी त्यांना विनंती करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘डेटा’ देवाणघेवाण करण्याविषयी संयुक्त राष्ट्र संघातही चर्चा !
‘डेटा इज न्यू ऑईल’ असे म्हटले जाते. माहितीने तेलाच्या किमतीलाही मागे टाकले आहे. ज्याच्याकडे ‘डेटा’ आहे, तोच जगावर राज्य करू शकतो. स्वत:च्या माहितीवर स्वत:चा अधिकार रहावा, याविषयी जगातील विविध देशांमध्ये काम चालू आहे. ‘डेटा’ची देवाणघेवाण होण्याविषयी संयुक्त राष्ट्र संघातही चर्चा चालू आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले