२०२१ मध्ये ललित पाटीलची चौकशीच झाली नाही! देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट; तत्कालीन सरकारकडून पोलीस आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली

    12-Dec-2023
Total Views | 206
lalit krushnaprakas 2 
 
नागपूर : पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासंदर्भात २ एप्रिल २०२१ रोजी राज्याच्या गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते. परंतु, राज्य सरकारकडून त्यांना उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगीच मिळाली नाही. त्यामुळे ललितचा पहिला ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर २०२१ मध्ये त्याची एकदाही त्याची चौकशी होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत केला.
 
ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसंदर्भात विधानपरिषदेत उपस्थित तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०२१ मध्ये ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर त्याचा ताबा घेऊन चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गृह विभागाला पत्र लिहिले. ‘ललित पाटील हा अमली पदार्थांसंदर्भातील गंभीर गुन्ह्यांत सहभागी आहे. त्याचा ताबा घेण्याची आवश्यकता होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे तो एनसीआरमध्ये (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) गेला. आता १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करावे लागेल. त्यासाठी परवानगी देण्यात यावी’, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. परंतु, तत्कालीन सरकारने त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या ललित पाटीलची एक दिवसही पोलीस चौकशी झाली नाही. सध्या त्याची चौकशी वेगळ्या गुन्ह्यात सुरू आहे. पण, पहिला ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर एकदाही चौकशी झालेली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
 
या तस्करी प्रकरणात पोलिसांचा सहभाग नाही. परंतु, पोलिसांकडून ललित पाटीलला मदत झाली, हे खरे आहे. त्यामुळे ४ जणांवर कलम ३११ अंतर्गत बडतर्फीची कारवाई करण्यात आली. तर, ६ जणांना निलंबित केले आहे. ड्रग्जसंदर्भात आमच्या सरकारची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. त्यामुळे पहिल्यांदाच थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यापुढे पोलीस दलातील कोणाचाही ड्रग्जप्रकरणाशी संबंध आढळल्यास थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनाही पदमुक्त केले आहे. त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आल्यास अटकही केली जाईल, असे त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.
 
अँटी नार्कोटिक्स ‘टास्क फोर्स’
इन्स्टाग्राम ही आता अमलीपदार्थांची नवी बाजापेठ म्हणून समोर येत आहे. तेथून ऑर्डर प्लेस करून ऑनलाईन पेमेंट केले जाते. त्यानंतर कुरिअरने पुरवठा होतो. डार्कनेटच्या माध्यमातून व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे सगळ्या कुरिअर कंपन्यांना तपासणी करूनच कुरिअर पुढे पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत. ड्रग्ज तस्करीची साखळी मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ड्रग्ज पेडलरवर कारवाई करून आपण थांबायचो. पण आता आपण मुळासकट रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अँटी नार्कोटिक्स ब्युरोला आम्ही आता टास्क फोर्समध्ये परिवर्तित करीत आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121